पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:43 IST2025-07-02T15:38:51+5:302025-07-02T15:43:46+5:30

हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला. अनेक ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. ५१ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण अजूनही बेपत्ता आहेत.

ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलन... निसर्गाच्या प्रकोपाचा हिमाचल प्रदेशला तडाखा बसला. मंगळवारी एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी झाली. नद्या-नाल्यांना पूर आले आणि अनेक ठिकाणी घरेही वाहून गेली.

पाऊस आणि पुरामुळे वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असून, त्यात ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

फक्त मंडी जिल्ह्यातच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. १०३ लोक जखमी झाले आहेत. मंडी जिल्ह्यात ७ ठिकाणी ढगफुटी होऊन पूर परिस्थिती ओढवली. अचानक पूर आल्याने, त्याचबरोबर ढगफुटी झाल्याने काही गावांचा संपर्क तुटला.

राज्य आपतकालीन मोहीम केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ५१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूर, पाण्यात बुडून, भूस्खलन आणि वीज पडून अशा घटनांमध्ये हे बळी गेले आहेत.

सध्या २२ लोक बेपत्ता आहेत. सर्वाधिक मृत्यू मंडी जिल्ह्यात झाले आहेत. तर तिथे ३४ लोक बेपत्ता आहे. अचानक पूर, ढगफुटी या कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. असंख्य घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून,२८३ कोटींच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे.

२८२ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सध्या शोध आणि मदत कार्य वेगात सुरू असून, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांचीही मदत घेतली जात आहे.