Corona Vaccine: गुड न्यूज! भारताने तयार केलीय प्राण्यांसाठी कोरोना लस; श्वानांवरील चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:46 PM2022-01-20T17:46:16+5:302022-01-20T17:54:15+5:30

Corona Vaccine: अन्य काही ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर देशात प्राण्यांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनासह नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची संख्याही वाढताना दिसत आहे. यासाठी कोरोना लसीकरण हाच एकमेव उपाय असल्यामुळे त्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे.

केवळ माणसांना नाही, तर प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची अनेक उदाहरणे देशभरात दिसून आली. भारत हा भूतदया मानणारा देश असल्यामुळे माणसाप्रमाणे प्राण्यांसाठी गुणकारी अशा कोरोना लसीची निर्मित करण्यात आली आहे.

आपल्या देशातील हरयाणामधील हिस्सार येथे प्राण्यांवरील उपयुक्त अशा कोरोना लसीची निर्मिती करण्यात आली आहे. या कोरोना लसीची ट्रायल २३ श्वानांवर घेण्यात आली. यातील काही श्वानांमध्ये २१ दिवसांनंतर कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँडीबॉडी तयार झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले.

हिस्सार येथे श्वानांवरील ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आता गुजरातमध्ये असलेल्या जुनागड येथे १५ वाघ, सिंहांवर कोरोना लसीची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी गुजरात सरकारकडून परवानगी घेतली जाणार आहे. त्यानंतरच ही ट्रायल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या ट्रायल यशस्वी झाल्यास आणि त्याला मंजुरी मिळाल्यास देशातील प्राण्यांना या लसी दिल्या जातील, असे सांगितले जात आहे. हिसारचे केंद्रीय अश्व संशोधन संस्थेचे डॉ. यशपाल सिंह यांनी सांगितले की, कोरोनाची लागण माणसातून प्राण्यांमध्ये झालेली काही उदाहरणे समोर आली.

प्राण्यांमध्ये कोरोनाची लागण वाढू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण करणे आवश्यक आहे. अमेरिका आणि रशियामध्ये प्राण्यांवरील कोरोना लसीची निर्मिती करण्यात आली असून, लसीकरणास सुरुवातही झाली आहे. आम्हीही भारतातील संशोधकांनी यावर काम करून लस तयार करण्यात आली आहे.

यानंतर आता प्राण्यांवरील कोरोना लसीच्या सुरुवातीच्या ट्रायल यशस्वी झाल्या आहे. हे एक मोठे यश आहे, असेही यशपाल सिंह यांनी नमूद केले. तसेच कोरोनावर नियंत्रणासाठी प्राण्यांचे लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. केंद्रातील मोदी सरकार यामध्ये गांभीर्याने काम करत असून, हिस्सार येथील संशोधन संस्थेने यासंदर्भात सकारात्मक काम केले असून, शास्त्रज्ञांचे आम्ही अभिनंदन करतो, असे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या डॉ. बीएन त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आताच्या घडीला भारतात ८ कोरोना लसी आहेत. मात्र, त्यापैकी केवळ तीनच लसी दिल्या जात आहेत. उरलेल्या ५ लसींचे काय होते? याची कोणालाच कल्पना नाही. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेल्या कोविशील्डचा सर्वाधिक म्हणजेच ९० टक्क्यांहून अधिक वापर झाला आहे. त्यानंतर भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन वापरली गेली. रशियाची स्पूतनिक व्ही कमी प्रमाणावर वापरली गेली.

लसीकरण डेटा ठेवणाऱ्या CoWin प्लॅटफॉर्मनुसार, १९ जानेवारीपर्यंत Covishield चे १३७.२१ कोटी डोस आणि Covaxin चे २१.६९ कोटी डोस देण्यात आले आहेत. तर, Sputnik-V चे फक्त १२ लाख डोस देण्यात आले आहेत.

Covishield, Covaxin आणि Sputnik-V व्यतिरिक्त, आणखी ५ लसी आहेत ज्यांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. यापैकी कोवोव्हॅक्स आणि कॉर्बेव्हॅक्स या दोन लसींना २८ डिसेंबरलाच मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय मॉडर्नाला गेल्या वर्षी २९ जून, जॉन्सन अँड जॉन्सनला ७ ऑगस्टला आणि Zy-COV-D ला २० ऑगस्टला मान्यता मिळाली होती.

Moderna ची लस आयात करण्याची सिप्लाला परवानगी मिळाली, परंतू यावर पुढील काहीच माहिती नाही. Johnson & Johnsonची लस देखील Biological-E या भारतीय कंपनीच्या दाराने भारतात येणार होती. या लसीचेदेखील पुढे काय झाले, कोणालाच माहिती नाही.

Zy-COV-D या तीन डोसच्या लसीला मान्यता मिळाली, ही नेझल व्हॅक्सिन आहे. १२ वर्षांवरील लोकांना ती दिली जाणार होती. ५ कोटी डोस मिळणार होते. अद्याप ही लस लोकांना दिली गेली नाही.