गुजरातमध्ये संयम सुटला, गावी परतण्यासाठी मजुरांची पोलिसांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 09:54 PM2020-05-15T21:54:16+5:302020-05-15T22:04:32+5:30

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केलं. रोजगाराच्या शोधात आपलं घर सोडून इतर राज्यांत गेलेल्या मजुरांचे या काळात चांगलेच हाल झाले.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांची सोय केली. मात्र आजही अनेक महत्वाच्या शहरांमध्ये परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातमध्ये अडकून पडलेले कामगार घरी जाण्यासाठी रस्त्यावर येताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सूरत, अहमदाबाद शहरात परप्रांतीय कामगारांनी रस्त्यावर येत पोलिसांवर हल्ला केला होता.

शुक्रवारी भरुच जिल्ह्यातील इंडस्ट्रिअल एरियात सुमारे १५० परप्रांतीय कामगारांचा गट आपल्याला घरी जाण्यासाठी सोय करावी, या मागणीसाठी हे कामगार स्थानिक पोलिस ठाण्यात जमा झाले होते.

यावेळी संतापाचा उद्रेक झाल्यानंतर कामगारांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. गुरुवारीही काही कामगार रस्त्यावर उतरले होते.

कामगारांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे कामगार परत गेले. मात्र, शुक्रवारी यापैकी काही कामगारांनी पुन्हा एकदा रस्त्यावर येत पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून आलेले अनेक परप्रांतीय कामगार आहेत. लॉकडाउन काळात रोजगार तुटल्यामुळे या मजुरांच्या हातात कोणतंही काम राहिलेलं नाही.

पैसे संपत आल्यामुळे आपल्या घरी जाण्याचे सर्व रस्ते या मजुरांसाठी बंद झालेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने आपली घरी जाण्याची सोय करावी या मागणीसाठी गुजरातमध्ये कामगार वारंवार रस्त्यावर येत असल्याचं पहायला मिळतंय.

केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानतर तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.

आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मजूर गावी जाताना दिसत आहेत. देशातील विविध रेल्वे स्थानकांवरुन काही ट्रेनही परराज्यात रवाना झाल्या आहेत. तर, काही मजूर बसमधून रवाना होत आहेत.

मात्र, अद्यापही लाखो मजूर अडकून पडले आहेत, या मजूरांना, स्थलांतरीतांना त्यांच्या गावी जायचं आहे. पण, दफ्तर दिरंगाई आणि राज्य सरकारची परवानगी, यामुळे हे मजूर अडकले आहेत.

अखेर मजूरांचा संयम सुटताना दिसत आहे, प्रशासकीय यंत्रणांशी दोनहात करत हे मजूर गावी जाण्याची धडपड करत आहेत.