Gold-Silver Rate: चांदी दीड लाखांवर?; गुंतवणूकदारांना दोन वर्षांत २५० टक्के परताव्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:57 AM2022-01-15T10:57:50+5:302022-01-15T10:59:43+5:30

२०२२ आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात तेजी पहायला मिळणार असल्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी म्हटले की, या वर्षी चांदी ८० हजार आणि पुढील तीन वर्षांत १.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

सध्या चांदीचे दर ५९ हजार रुपयांपर्यंत घसरून पुन्हा ६१ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत आले आहेत. त्यानुसार, चांदी यावर्षी ३३ टक्के आणि पुढील तीन वर्षांत २५० टक्के परतावा देण्याची शक्यता आहे.

पृथ्वी फिनमार्टचे संचालक मनोज कुमार जैन यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, यंदा चांदी ७४ हजार आणि तीन वर्षांत एक लाखापर्यंत पोहोचू शकते. त्यानुसार चांदी ६७ टक्केपेक्षा जास्त परतावा देऊ शकते. जागतिक अहवालानुसार २०२२-२४ दरम्यान चांदीची मागणी २५-३० टक्के वाढेल. याचाच अर्थ चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होणे शक्य आहे.

लंडनस्थित सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या मते, गेल्या पाच वर्षांपासून चांदीची जागतिक मागणी सातत्याने वाढत आहे. याला अपवाद होता २०२०, जेव्हा कोरोना महामारी टोकाला पोहोचली होती. याउलट, २०१७ पासून चांदीच्या खाणकामात सातत्याने घट होत आहे.

केवळ २०२१ मध्ये वार्षिक आधारावर चांदीच्या खाणकामात वाढ झाली; परंतु हे २०२०च्या कमी उत्पादनामुळे दिसत आहे. तरीही, खाणकामात केवळ ८.२ टक्के वाढ झाली, तर त्या काळात चांदीची मागणी १५.३ टक्के वाढली होती.