दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:59 IST2025-07-30T10:51:28+5:302025-07-30T10:59:14+5:30

Gir Forest Jai Veeru Death: जय आणि वीरूचा घात त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रादेशिक क्षेत्र वाचविण्याच्या लढाईत झाला, एकत्र असते तर...

गीरच्या जंगलातील जगप्रसिद्ध जय-विरूची जोडी आता अमर झाली आहे. महिनाभरापूर्वी विरुचे निधन झाले होते, त्याच्या विरहानंतर त्याचा परममित्र जयनेही मंगळवारी प्राण सोडले आहेत. आता गिरच्या जंगलातील पक्षी, प्राणी आणि वृक्षराजी जय-विरुच्या दोस्तीच्या कहाण्या सांगणार आहेत.

गुजरातच्या अहमदाबाद गीर जंगलातील जय-वीरूची गर्जना आता कायमची शांत झाली आहे. दोन सिंह ज्यांच्या मैत्रीच्या कहाण्या जगभरात सांगितल्या जात होत्या, त्या आता अमर झाल्या आहेत. जय आणि वीरूमध्ये वीरूचा एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. जयनेही मंगळवारी शेवटचा श्वास घेतला.

१९७५ च्या ब्लॉकबस्टर सिनेमा शोलेतील जय विरु वरून यांचे नाव पडले होते. जंगलात हे दोन्ही सिंह एकत्रच असायचे. यामुळे जंगर सफरीला आलेल्या पर्यटकांच्या तोंडामध्ये काय यांचेच नाव असायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या जय-विरुच्या जोडीचे चाहते होते.

महिनाभरापूर्वी जय आणि विरू दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या लढाईत हे दोन्ही सिंह जबर जखमी झाले होते. या सिंहांच्या प्रदेशावरून ही लढाई झाली होती. कोणताही वाघ किंवा सिंह आपल्या भागात दुसऱ्याला येऊ देत नाही. आपली हद्द वाचविण्याच्या या युद्धात ११ जूनला विरुचा मृत्यू झाला होता.

दोघांनाही वाचविण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतू, विरूच्या मृत्यूनंतर जयची प्रकृती ढासळत गेली. आम्ही दोघांनाही वाचवू शकलो नाही, असे गुजरातचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन जयपाल सिंग यांनी म्हटले आहे.

जय आणि वीरू हे नर सिंह अख्ख्या गीर जंगलावर राज्य करत होते. त्यांच्यासोबत १५ सिंहीणी होत्या. त्यांचा प्रदेश एवढा विशाल होता की पर्यटन क्षेत्रांपासून गैर-पर्यटन क्षेत्रांपर्यंत, गवताळ प्रदेशांपासून जंगलांपर्यंत आणि किनारी क्षेत्रांपर्यंत पसरला होता.

जय आणि वीरूचा घात त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रादेशिक क्षेत्र वाचविण्याच्या लढाईत झाला आहे. हे दोन्ही सिंह या वेगवेगळ्या मोर्चांवरील लढायांऐवजी एकत्र असते तर कोणत्याही दुसऱ्या सिंहाची हिंमत झाली नसती. परंतू, दोन्ही सिंह आपली हद्द राखत असताना दुसऱ्या सिंहांच्या हल्ल्यात जखमी झाले आणि गतप्राण झाले आहेत, असे वन्यजीव संरक्षक (सासन-गीर) मोहन राम यांनी म्हटले आहे.