विमानाला उशीर किंवा रद्द झाल्यास प्रवाशांना कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:19 AM2023-01-21T11:19:19+5:302023-01-21T15:52:45+5:30

flight : प्रवासी विमान कंपनीकडून कोणत्या गोष्टींची मागणी करू शकतो. याबाबत जाणून घ्या, जेणेकरुन वेळ आल्यावर प्रवासी या अधिकारांचा लाभ घेऊ शकेल.

नवी दिल्ली : हिवाळ्याच्या हंगामात खराब वातावरणामुळे अनेक वेळा विमान उड्डाणे करण्यास उशीर होतो आणि काही प्रकरणांमध्ये ते रद्द देखील केले जातात. अशा परिस्थितीत प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

विमानतळावर तासनतास बसून राहणे किंवा उड्डाण रद्द झाल्यामुळे काही महत्त्वाचे काम चुकणे, हा निराशाजनक अनुभव असू शकतो. जर कोणत्याही प्रवाशाचे विमान रद्द झाले किंवा उशीर झाला, तर अशा स्थितीत त्याला काय अधिकार आहेत.

प्रवासी विमान कंपनीकडून कोणत्या गोष्टींची मागणी करू शकतो. याबाबत जाणून घ्या, जेणेकरुन वेळ आल्यावर प्रवासी या अधिकारांचा लाभ घेऊ शकेल. 2019 मध्ये नागरी उड्डयन मंत्रालयाने या संदर्भात एक चार्टर जारी केला होता, त्यात काय म्हटले आहे ते पाहूया....

डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, एखाद्या विमानाला 6 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, प्रवाशांना 24 तास आधी पुनर्निर्धारित वेळेची माहिती द्यावी लागेल. तसेच प्रवासी एवढा वेळ थांबायला तयार नसतील तर त्यांना दुसऱ्या विमानामध्ये पाठवावे किंवा संपूर्ण पैसे परत करावेत.

24 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, विमान कंपनी प्रवाशांसाठी मोफत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करेल. जर एखादे विमान सकाळी 8 ते पहाटे 3 च्या दरम्यान उड्डाण करणार असेल, परंतु 6 तासांनी उशीर झाला तर प्रवाशांना हॉटेलमध्ये मोफत राहण्याची व्यवस्था केली जाईल.

ठराविक वेळेपेक्षा उशीर झाल्यास, कंपनी प्रवाशांना जेवण आणि अल्पोपाहार देईल. ही निश्चित वेळ विमान उड्डाणाच्या ब्लॉक वेळेवर अवलंबून असेल. विमानाचे उड्डाण आणि गंतव्यस्थानावर लँडिंग दरम्यानच्या कालावधीला ब्लॉक वेळ म्हणतात. उदाहरणार्थ, जर ब्लॉकची वेळ 2:30 तास असेल, तर 2 तासांनंतर आणि विमान उशीर झाल्यानंतर जेवण आणि नाश्ता दिला जाईल.

साधारणपणे, फ्लाइट कंपन्या प्रत्यक्ष उड्डाण वेळेच्या 2 आठवडे आधी प्रवाशांना फ्लाइट रद्द झाल्याची माहिती देतात. अशा परिस्थितीत, एकतर विमान कंपनी तुमच्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करेल किंवा तुम्हाला परतावा देऊ करेल. 24 तास अगोदरही विमान रद्द झाल्याची माहिती एअरलाइन कंपनीने प्रवाशांना दिली नाही किंवा विमान रद्द केल्यामुळे त्याच तिकिटावर सूचीबद्ध केलेली कनेक्टिंग फ्लाइट चुकली, तर प्रवाशांना भरपाई मिळते.

ही भरपाई 5,000-10,000 च्या दरम्यान असू शकते. जर तुम्ही रोखीने पेमेंट केले असेल, तर एअरलाइनला लगेच पैसे परत करावे लागतील. तसेच, क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे बुकिंग केल्यास ही रक्कम 1 आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. परताव्यात प्रवासी सेवा शुल्क, विमानतळ विकास शुल्क आणि सेवा कर यांचा समावेश आहे.

टॅग्स :विमानairplane