१२ वर्षांखालील मुलांना देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नैराश्य, लठ्ठपणाचा मोठा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:37 IST2025-12-03T14:31:19+5:302025-12-03T14:37:51+5:30

‘पेडियाट्रिक्स जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण आणि सखोल अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, १२ वर्षांच्या आतील मुलांच्या हातात स्मार्टफोन देणे हे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

हा अभ्यास अमेरिकेतील १०,५०० हून अधिक मुलांवर करण्यात आला असून, त्याला आता मुलांच्या मेंदूच्या विकासावरील सर्वात व्यापक संशोधन मानले जात आहे. संशोधकांनी तुलना करण्यासाठी अशा मुलांचाही अभ्यास केला ज्यांच्याकडे १२ वर्षांपूर्वी स्मार्टफोन नव्हता.

संशोधनात असे आढळले की, ज्या मुलांना १२ वर्षांपेक्षा कमी वयात स्मार्टफोन मिळाला, त्यांच्यात नैराश्य, लठ्ठपणा, झोपेची कमतरता अशा समस्या प्रामुख्याने दिसून आल्या.

ही मुले अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागी राहत असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि दैनंदिन जीवनातील सवयींच्या पॅटर्नमध्ये असमतोल आढळला.

याउलट, ज्या मुलांच्या पालकांनी त्यांना स्मार्टफोन देणे टाळले होते, त्या मुलांची मानसिक स्थिती अधिक चांगली राहिली होती.

या अभ्यासाच्या आधारावर मुलांचे आरोग्य जपण्यासाठी पालकांना काही उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्य असेल तितका स्मार्टफोन मुलांच्या हातात उशिरा द्या. मुलांना साधा फोन, मूलभूत स्मार्ट वॉच किंवा लँडलाइनचा वापर करू द्या.

मुलांना खेळ आणि व्यायामासारख्या गोष्टींमध्ये सक्रिय ठेवा. मुलांची झोप प्रभावित होऊ नये म्हणून रात्री फोन त्यांच्या बेडरूमच्या बाहेर ठेवा. मुले फोनवर काय पाहत आहेत, यावर पालकांनी पूर्ण लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

















