तुमच्या कुटुंबातही अनेकजण घेताहेत का प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ? होऊ शकते चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:10 PM2020-08-27T13:10:32+5:302020-08-27T13:47:24+5:30

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमार्फत मिळत असलेल्या मदतीचा लाभ घेण्यासाठी अपात्र असलेले लोकही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे याबाबतचा तपास होणार आहे.

शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी मदत व्हावी म्हणून, केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी दोन हजारांचे तीन हप्ते असे सहा हजार रुपये दिले जातात.

गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, हा सकरारचा हेतू आहे. मात्र गरजू शेतकऱ्यांसोबत काही अशा व्यक्तीही या योजनेचा लाभ घेत आहेत ज्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा लोकांची नावे या योजनेमधून हटवण्याची तयारी सरकारने केली आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील अनेकजण शेतीशी संबंध नसताना या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमार्फत मिळत असलेल्या मदतीचा लाभ घेण्यासाठी अपात्र असलेले लोकही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे याबाबतचा तपास होणार आहे.

आता या चौकशीच्या कुठले कुठले लाभार्थी येऊ शकतात, याचा घेतलेला हा आढावा. सरकारी कर्मचारी आणि सुखी संपन्न लोक या योजनेचा लाभ घेत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या योजनेत या लोकांचा समावेश कसा झाला याचा शोध घेण्यात येणार आहे. पॅनकार्डच्या माध्यमातून अशा लाभार्थ्यांचा शोध घेतला जाईल. कारण यापैकी अनेक लोक हे प्राप्तिकर भरतात मात्र दोन हजार रुपयांच्या मदतीचाही लाभ घेतात.

याशिवाय ज्यांच्याकडे शेतीसाठी जमीन नाही किंवा एवढीच जमीन आहे जी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त नाही.अशा लोकांना या योजनेल्या लाभार्थ्यांच्या यादीतून बाहेर काढले जाईल. तसेच शेतीयोग्य जमीन शेतकऱ्यांच्या नावावर नसेल तर त्यांना अशा योजनेचा लाभ मिळणार नाही. याची चौकशी कृषी विभाग आणि प्राप्तिकर विभागाच्या मदतीने केला जाईल.

तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील अनेक लोक घेत असल्याचे समोर आले आहे. ही बाब नियमाविरुद्ध आहे. नियमानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. मात्र अशी शेतजमीन शेतकऱ्याच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर असेल तर तर अशा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

सेवेत कार्यरत असलेले आणि निवृत्त झालेले सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच एखाद्या व्यक्तीकडे शेतजमीन असेल मात्र १० हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन मिळत असेल तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

याशिवाय रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनियर, वकील, सीए आणि वास्तुविशारद आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच जर नोंदणीकृत शेतीयोग्य जमिनीवर शेतकरी कुठले दुसरे काम करत असतील तर त्यांनाही पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेमध्ये नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना पुढच्या पाच वर्षांपर्यंत ६ हजार रुपये प्रतिवर्षी मदत दिली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी किसान सन्मान निधी पोर्टलवर अर्ज करू शकता. कर्जमाफीपेक्षा ही योजना अधिक चांगली आहे, असे अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांचे मत आहे.

या योजनेची सुरुवात गतवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून झाली होती. तसेच याचा लाभ शेतकऱ्यांना डिसेंबर २०१८ पासून देण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हप्त्यामध्ये १२ हजार रुपये जमा झाले आहेत.

या योजनेची संपूर्ण रक्कम ही केंद्र सरकारकडून दिली जाते. तसेच आधार लिंकच्या माध्यमातून ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. शेतकऱ्यांना शेतीविषयक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ही मदत दिली जाते.