नेहरुंनीही नेपाळच्या राजाला काठमांडूतून उचललेले?; व्हेनेझुएलाच्या निमित्ताने त्या ऐतिहासिक घटनेची चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:45 IST2026-01-05T11:37:46+5:302026-01-05T11:45:02+5:30
Nepal King Tribhuvan and India Kidnapping : अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केल्यानंतर इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे दक्षिण आशियाई देशांमध्ये एका ऐतिहासिक घटनेची आठवण ताजी झाली आहे.

१९५० मध्ये जेव्हा नेपाळचे अस्तित्व धोक्यात होते, तेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेपाळचे राजा त्रिभुवन यांना दिलेली मदत आज पुन्हा चर्चेत आली आहे.

१९५० च्या दशकात नेपाळमध्ये राणा घराण्याकडे खरी सत्ता होती आणि राजा केवळ नामधारी होता. राणांच्या जुलमी राजवटीमुळे राजा त्रिभुवन यांचे प्राण धोक्यात आले होते. अशा वेळी भारताने नेपाळच्या लोकशाहीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला.

६ नोव्हेंबर १९५० रोजी राजा त्रिभुवन यांनी फिरायला जातोय असे भासवून आपल्या कुटुंबासह काठमांडूतील भारतीय दूतावासात आश्रय घेतला. राणांनी त्यांना पकडण्याचे प्रयत्न केले, पण भारताने त्यांना संरक्षण दिले.

त्याच दिवशी एक विशेष विमान दिल्लीहून काठमांडूला उडाले होते. भारताने नेपाळच्या राजाला सुरक्षितपणे दिल्लीत आणले. पंडित नेहरूंनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले, जे त्या काळी एक मोठे राजनैतिक पाऊल होते.

भारताने स्पष्ट केले की, ते राजा त्रिभुवन यांनाच नेपाळचे अधिकृत प्रमुख मानतील. नेहरूंनी राणा राजवटीवर लोकशाही सुधारणांसाठी दबाव आणला.

नेहरूंच्या मध्यस्थीने १९५१ मध्ये 'दिल्ली करार' झाला. या करारामुळे राणांची कित्येक वर्षांची राजवट संपुष्टात आली आणि नेपाळमध्ये लोकशाहीची पायाभरणी झाली.

राजा त्रिभुवन पुन्हा नेपाळच्या गादीवर बसले. भारताच्या या मदतीमुळेच नेपाळचे सार्वभौमत्व टिकून राहिले.

व्हेनेझुएलाच्या घटनेशी संबंध काय?
आज जेव्हा अमेरिका एका देशाच्या प्रमुखाला (मादुरो) ताब्यात घेते, तेव्हा नेपाळमधील लोक आठवण काढत आहेत की, भारताने कधीही नेपाळवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. भारताने नेहमीच नेपाळच्या राजेशाहीला आणि तेथील जनतेला संकटकाळी मदत केली.

















