जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:14 IST2025-11-11T13:09:03+5:302025-11-11T13:14:31+5:30

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील स्फोटानं राजधानी हादरली आहे. जवळपास १४ वर्षांनी भारताच्या राजधानीत स्फोटाचा आवाज घुमला आहे. या घटनेमुळे दिल्ली पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सातत्याने तपास, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

दिल्लीच्या स्फोटात आतापर्यंत १० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. त्यात काही जखमीही आहेत. या स्फोटामागे पाकिस्तानचं कनेक्शन आता समोर येताना दिसत आहे. फरीदाबाद टेरर मॉड्यूलशीही हे जोडले गेले आहे. ज्यात स्फोटापूर्वी ३ डॉक्टरांसह ७ संशयितांना अटक केली होती.

फरीदाबादच्या कारवाईत एका महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली, जिचे नाव शाहीन शाहीद असं आहे. शाहीनचे दहशतवादी संघटना जैशसोबत कनेक्शन तपासात पुढे आले आहेत.

कोण आहे शाहीन शाहीद? - या कारवाईत जैश ए मोहम्मद आणि अंसार गजवत उल हिंदशी निगडित पांढरपेशी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला गेला. अटकेतील डॉक्टर शाहीन हिचे थेट जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा खुलासा समोर आला आहे.

लेडी डॉक्टर शाहीन ही जैशच्या महिला विंग जमात उल मोमिनतच्या भारत प्रमुख म्हणून काम करत होती. तिचे ध्येय भारतातील दहशतवादी गटात जास्तीत जास्त महिलांना भरती करणे होते असा दावा केला जात आहे.

डॉ. शाहीनच्या अटकेमुळे मोठा कट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाहीन ही लखनऊची रहिवासी असल्याचे सांगितले जाते. काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये तिच्या संशयित भूमिकेसाठी तिला अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अटक केलेल्या महिला डॉक्टरच्या कारमधून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. ती जिथे जायची तिथे तिच्या कारमध्ये एके-४७ घेऊन जायची असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डॉ. शाहीन एकटी नाहीयेत, तिच्यासोबत वेगवेगळ्या भागातून आणखी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी फरीदाबादमध्ये राहणारा काश्मीरचा डॉ. मुझम्मिल गनी आहे. या कारवाईत २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पोलिस दलांसह केंद्रीय एजन्सींच्या संयुक्त कारवाईत हे मोठे यश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लेडी डॉक्टर शाहीनलाही ताब्यात घेऊन चौकशीसाठी विमानाने श्रीनगरला आणण्यात आले.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोट हा अत्यंत गर्दीच्या ठिकाणी झाला. आतापर्यंत या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या स्फोटाचा संबंध फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जात आहे, ज्यामध्ये स्फोटापूर्वी तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेला चौथा डॉक्टर मोहम्मद उमर असल्याचे मानले जाते, जो आय-२० कार स्फोटात मारला गेला आहे. पोलिस आणि एजन्सी सध्या तपास करत आहेत.

















