Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी; ICMR च्या रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 11:00 AM2021-07-07T11:00:17+5:302021-07-07T11:23:38+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक माहिती समोर येत आहे.

देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 3 कोटींवर गेली आहे.

कोरोनामुळे देशातील तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात आयसीएमआऱच्या (ICMR) एका अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका हा 95 टक्क्यांपर्यत कमी होतो.

तामिळनाडूच्या पोलीस दलातील एक लाख 17 हजार 524 जवानांच्या आधारे एक रिसर्च करण्यात आला. या संशोधनादरम्यान लस घेतलेले जवान आणि लस न घेतलेले जवान यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आलं.

1 फेब्रुवारी 2021 ते 14 मे 2021 या कालावधीत हा रिसर्च करण्यात आला. या रिसर्चसाठी लसीचा एक डोस घेतलेले 32 हजार 792 कर्मचारी निवडण्यात आले. लसींचे दोन्ही डोस घेतलेले कर्मचारी 67673 होते तर 17059 पोलीस कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती.

रिसर्चनुसार, 13 एप्रिल 2021 ते 14 मे 2021 या दरम्यान 31 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी 4 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर 7 जणांनी एकच डोस घेतला होता. बाकीच्या 20 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती.

रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लस प्रभावी आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका 82 टक्क्यांपर्यंत कमी होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी होता असं आढळून आलं.

ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या तुलनेत लस घेतलेल्या लोकांना मृत्यूचा धोका फारच कमी आहे. पहिला डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका 0.18 टक्के होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका 0.05 टक्के होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पंजाब, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह देशाती 10 मोठ्या राज्यांमध्ये आता कोरोनाचा वेग कमी झाला आहे. मात्र काही राज्यांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, मिझोरम, तेलंगणा, जम्मू कश्मीर आणि झारखंडमध्ये कोरोना अद्यापही जीवघेणा ठरत आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांमध्ये एवॅस्कुलर नेक्रोसिस (Avascular necrosis- AVN) म्हणजेच बोन डेथ (Bone Death) ची समस्या पाहायला मिळत आहे. बोन डेथमध्ये शरीरातील हाडांवर गंभीर परिणाम होत आहे.

बोन टिश्यूपर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होत नसल्याने एवॅस्कुलर नेक्रोसिसची गंभीर समस्या रुग्णांमध्ये निर्माण होत आहे. मुंबईतील 40 वर्षांहून कमी वय असलेल्या तीन रुग्णांमध्ये एवॅस्कुलर नेक्रोसिस आढळून आले आहेत.

मुंबईत बोन डेथचे रुग्ण आढळून आल्याने ड़ॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच येत्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती देखील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "त्या रुग्णांना मांडीच्या हाडाच्या वरच्या भागात दुखणं जाणवलं, तिन्ही रुग्ण डॉक्टर होते म्हणून त्यांना हे लवकर लक्षात आलं आणि त्यांनी लगेच उपचारांसाठी रुग्णालय गाठलं."