coronavirus: मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय? कसे होते त्याचे उत्पादन आणि वाहतूक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 12:52 PM2021-04-22T12:52:38+5:302021-04-22T13:05:25+5:30

oxygen shortage in india : कोरोना विषाणूचा वाढत्या संसर्गामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या बेसुमार प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशभरातील रुग्णालयामधून मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांमधील मेडिकल ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आज आपण जाणून घेऊयात मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय, त्याचे उत्पादन कसे होते आणि त्याची वाहतूक कशी होतो याविषयी.

कोरोना विषाणूचा वाढत्या संसर्गामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या बेसुमार प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशभरातील रुग्णालयामधून मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. काही ठिकाणी मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना या ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांमधील मेडिकल ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आज आपण जाणून घेऊयात मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय, त्याचे उत्पादन कसे होते आणि त्याची वाहतूक कशी होतो याविषयी.

सजीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची सर्वाधिक गरज असते. ऑक्सिजनविना सजीव काही वेळसुद्धा जिवंत राहू शकत नाही. हा ऑक्सिजन हवा आणि पाण्यामध्ये उपस्थित असतो. हवेत २१ टक्के ऑक्सिजन तर ७८ टक्के नायट्रोजन असतो. मात्र ऑक्सिजन प्लँटमध्ये हवेमधून केवळ ऑक्सिजन वेगळा केला जातो.

मेडिकल ऑक्सिजन हा ९८ टक्क्यांपर्यंत शुद्ध असतो. यामध्ये बाष्प, धूळ किंवा इतर वायू नसतात. २०१५ मध्ये देशातील अत्यावश्यक औषधांच्या यादीत ऑक्सिजनचा समावेश केले होता. डब्ल्यूएचओनेसुद्धा आवश्यक वैद्यकीय सामुग्रीत त्याचा समावेश केला आहे. वातावरणातील २१ टक्के ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय उपचारांमध्ये करता येत नाही. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती द्रवरूपात शास्त्रीय पद्धतीने मोठमोठ्या प्लँटमधून केली जाते.

मेडिकल लिक्विड ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी एअर सेप्रेशनच्या तंत्राचा वापर केला जातो. म्हणजेच हवेवर दाब देऊन नंतर ती फिल्टर करून त्यामधील अशुद्ध घटक वेगळे केले जातात. ही फिल्टर केलेली हवा थंड केली जाते. तिला अनेक प्रक्रियांमधून जावे लागते.

सर्वप्रथम वातावरणातील शुद्ध ऑक्सिजन केला जातो. ऑक्सिजनचा बॉयलिंग पॉईंट - १८३.०० डिग्री सेल्सियस एवढा आहे. हवा खूप थंड करून त्यातून ऑक्सिजन वेगळा केला जातो. हा ऑक्सिजन द्रवरूपात गोळा केला जातो. यामधून ९९.५ टक्के शुद्ध लिक्विड ऑक्सिजन मिळतो.

त्यानंतर ऑक्सिजनला कॉम्प्रेस करून गॅसमध्ये परिवर्तित केले जाते. मग रिफिलिंग स्टेशनला पुरवून सिलेंडरमध्ये जमा केले जाते. हा ऑक्सिजन गॅस मोठ्या आणि लहान कॅप्सुलसारख्या टँकरमध्ये भरून रुग्णालयांपर्यंत पोहोचवला जातो. एका ऑक्सिजन सिलेंडरला भरण्यासाठी ३ मिनिटांचा अवधी लागतो. मात्र इथे एकावेळी पॅनेल बनवून २० पेक्षा अधिक सिलेंडर भरता येतात.