coronavirus:…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 01:07 PM2020-07-14T13:07:25+5:302020-07-14T13:19:05+5:30

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात येत आहे. मात्र यादरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर एक नवे अव्हान उभे राहिले आहे.

कोरोना विषाणूच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या संसर्गामुळे सध्या देशासमोरील संकट अधिकच चिंताजनक झाले आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीतच कोरोनामुक्त झालेल्यांच्या प्लाझ्मादानाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात येत आहे. मात्र यादरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर एक नवे अव्हान उभे राहिले आहे. देशातील १० पैकी तीन कोरोना रुग्ण प्लाझ्मा दान करण्यास अक्षम असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात अँटिबॉडी विकसित होत नसल्याचे उघड झाले आहे. जोपर्यंत शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात अँटिबॉडी तयार होत नाहीत तोपर्यंत कोरोना रुग्णांच्या शरीरातून प्लाझ्मा घेता येत नाही.

देशातील पहिल्या कोव्हेलेसेंट प्लाझ्मा बँकेने याबाबतची माहिती दिली आहे. इंस्टिट्युट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्स (आयएलबीएस) मध्ये स्थित देशातील पहिल्या कॉव्हेलेसेंट प्लाझ्मा बँकेतील डॉक्टरांनी सांगितले की, कोरोनामुक्त झालेल्या कुठल्याही रुग्णाला प्लाझ्मा दान करण्यापासून आम्ही अडवत नाही आहोत. मात्र संबंधित रुग्णांना दोन आठवडे आराम केल्यानंतर प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत.

आयएलबीएडचे डॉ. एस.के. सरीन यांनी सांगितले की, जर रुग्णांच्या शरीरात न्यूट्रिलायझिंग अँटिबॉडी निश्चित प्रमाणात तयार झाल्या नाहीत तर आम्ही त्यांना दोना आठवड्यानंतर पुन्हा बोलावतो. रुग्णाच्या शरीरात पुरेशा प्रमाणात अँटिबॉडी विकसित व्हाव्यात यासाठी हे केले जाते.

अमेरिकेतील एफडीएच्या म्हणण्यानुसार सर्वसाधारणपणे शरिरामध्ये न्यूट्रिलायझिंग अँटिबॉडी कमीत कमी १: १६० एवढ्या असल्या पाहिजेत. जेणेकरून प्लाझ्मा डोनेशन करता येईल. एक्सपर्ट्स सांगतात की, कुठलाही पर्याय नसेल तर १:१८० च्या स्तरावर सुद्धा प्लाझ्मा डोनेशन करू शकता. पण असे करणे संबंधितांसाठी नुकसानकारक ठरू शकते. १० पैकी ३ रुग्णांच्या शरीरामध्ये १:१६० पेक्षा कमी अँटिबॉडी दिसून आल्या आहेत.

काही कोरोनाबाधित रुग्णांच्या शरीरात १:४० एवढ्या प्रमाणात अँटिबॉडी दिसून आल्या आहेत. हा स्तर एवढा कमी आहे की ज्यामध्ये प्लाझ्मा दान करता येऊ शकत नाही. तसेच अशा रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कायम असतो.

मात्र कोरोना विषाणूशी लढण्यासाठी शरीरामध्ये किती प्रमामात अँटिबॉडी असणे आवश्यक आहे , हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आयएलबीएस येथे प्लाझ्मा बँक उघडल्यापासून आतापर्यं सुमारे २५० युनिटपेक्षा अधिक प्लाझ्मा जमा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत एवढ्या युनिटमधून उपचार होऊ शकतात. तसेच काही रुग्ण्ंना कोवोलेसेंट प्लाझ्मा थेरेपीही करता येऊ शकेल.

खरंतर कोवेलेसेंट प्लाझ्मा थेरेपी ही उपचार विज्ञानातील एक सामान्य पद्धत आहे. सुमारे १०० वर्षांपासून तिचा उपयोग संपूर्ण जगात केला जात आहे. या उपचार पद्धतीचा खरोखर लाभ होत असून कोरोनाबाधित रुग्णसुद्धा या उपचार पद्धतीने बरे झाल्याचे दिसून आले आहे.

ही एक विश्वसनीय उपयार पद्धती असून, तिच्या माध्यमातून तज्ज्ञ आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील रक्ताच्या माध्यमातून नव्या रुग्णावर उपचार करतात. यामध्ये बऱ्या झालेल्या रुग्णाकडून घेण्यात आलेल्या रक्तामधून प्लाझ्मा काढले जातात. त्यानंतर ते दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात सोडले जातात.

मानवी रक्तामध्ये ५५ टक्के प्लाझ्मा, ४५ टक्के लाल रक्त पेशी आणि १ टक्का पांढऱ्या रक्तपेशी असतात. प्लाझ्मा थेरेपीमुळे रुग्ण कुठल्याही औषधाशिवाय आजाराशी लढण्याची क्षमता मिळवतो.

त्यामुळे संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी वेळ मिळतो. तसेच लगेच लस शोधण्यासाठी खर्चही करावा लागल नाही. प्लाझ्मा शरीरात अँटिबॉडी विकसित करतो. जेव्हा हा प्लाझ्मा इतर व्यक्तीच्या शरिरात सोडला जातो. तेव्हा तिथे तो अँटीबॉडी विकसित करण्यास सुरुवात करतो.