Corona Vaccine : कोरोनाच्या संकटात Relianceचं मोठं पाऊल; 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित, 10 लाख लोकांचं केलं लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:16 AM2021-07-27T09:16:32+5:302021-07-27T09:33:52+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : रिलायन्स परिवारातील सर्व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि ग्रुपशी संबंधित 98 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

देशात कोरोना लसीकरण मोहीम देखील सुरू असून लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान भारतातील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या संकटात रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने देशभरातील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली होती. कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च रिलायन्स तर्फे उचलला गेला आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) चेअरपर्सन आणि संस्थापक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याबाबत माहिती दिली होती. नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंती केली होती.

रिलायन्स फाउंडेशनकडून (Reliance Foundation) समूहातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करण्याची मोहिम वेगाने सुरू असून आतापर्यंत कंपनीचे कर्मचारी आणि कुटुंबीय अशा एकूण 10 लाख जणांना कोरोना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने एप्रिल महिन्यात या मिशनची घोषणा करण्यात आली होती. कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी कार्यक्रमानुसार "मिशन व्हॅक्सिन सुरक्षा" हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

रिलायन्स परिवारातील सर्व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि ग्रुपशी संबंधित 98 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या 98 टक्के कर्मचाऱ्यांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी यांनी रिलायन्स परिवारात ही मोहिम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता देशपातळीवर ही मोहीम राबवणं गरजेचं असून भारतीय म्हणून आपलं ते कर्तव्य असल्याची भावना व्यक्त केली.

आपण सर्वांनी एकत्र येत कोरोनाच्या संकटावर मात करायला हवी. त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आपण नेहमीच सज्ज असून लवकरच ते उद्दिष्टही साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रिलायन्स फॅमिली डे 2020 च्या मेसेजमध्ये, 'मुकेश आणि मी दोघांनीही खात्री दिली होती की COVID-19 लसीला मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रिलायन्स कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लस मिळावी याकरता आम्ही खास योजना आखू. आम्ही त्या ध्येयाशी बांधिल आहोत' असं म्हटलं होतं.

"तुमच्या पाठिंब्यामुळे, आपण लवकरच या संकटाला मागे सोडू. तोपर्यंत निराश होऊ नका. अधिकाधिक सुरक्षा आणि स्वच्छतेची खबरदारी घेणे सुरू ठेवा. आपण या सामुहिक लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एकत्र मिळून आपण विजय मिळवला पाहिजे आणि आपण जिंकू" असं देखील नीता अंबानी यांनी म्हटलं होतं.

नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना विश्वास देण्यासाठी या मेलच्या शेवटी 'कोरोना हरणार, देश जिंकणार' (Corona Harega, India Jitega) या घोषवाक्याचा देखील वापर केला होता. यानंतर आता 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे.