CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:07 AM2020-09-16T11:07:38+5:302020-09-16T11:19:57+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 50,20,360 वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण आढळले असून 1,290 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 82,066 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान कोरोनासंदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

नोएडामधील दोन आणि मुंबईतील चार आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्ली सीएसआईआरच्या इन्स्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (आयजीआयबी) च्या रिसर्चमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.

आयजीआयबीचे अनुराग अग्रवाल यांनी देशामध्ये रुग्णांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये मुंबईतील चार आणि नोएडातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाची पुन्हा लागण होते का याचा तपास करण्यासाठी आयजीआयबीच्या एका टीमने देशभरातून 16 आरोग्य कर्मचाऱ्यांचे सँपल घेतले असून त्याची चाचणी केली जात आहे.

गवर्नमेंट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज, ग्रेटर नोएडाचे डॉ. राकेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडातील दोन्ही आरोग्य कर्मचारी हे एकमेकांच्या संपर्कात आले होते.

एका कोरोनाग्रस्ताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तर दुसऱ्या रुग्णाला घरामध्ये आयसोलेट करण्यात आलं. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार क्षमता मजबूत नाही त्यांच्यावर व्हायरस पुन्हा हल्ला करत आहे.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास शरीरात असलेला व्हायरस पुन्हा शरीरात पसरतो आणि पुन्हा कोरोनाची लागण होते.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारानंतर कोरोनातून बऱ्या झालेल्या जवळपास 14 टक्के लोकांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

कोरोनाचा धोका पुन्हा निर्माण होत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे 50 लाख कोरोनाबाधितांपैकी 39 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशामध्ये कोरोनाचे 9 लाख 95 हजार 933 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांवर आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे 20 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.

कोरोनाबाबत सिरो सर्व्हेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेनुसार कोरोनामुक्त झालेल्या 30 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडी दिसून आलेल्या नाहीत.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असल्याचे गृहितक खोटे ठरले आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही समोर आले आहे.

Read in English