Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ८ हजार ३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 10:05 AM2021-11-29T10:05:56+5:302021-11-29T10:09:58+5:30

महाराष्ट्रात देखील ओमीक्रॉन व्हेरिएंटचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाने राज्यातील टास्क फोर्स, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉन (Omicron Variant of Corona) नं जगभरात अनेक देशातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. या व्हेरिएंटमुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमीक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने लोकांमध्ये पसरत असल्याचं WHO चं म्हणणं आहे.

देशभरात गेल्या २४ तासांत ८ हजार ३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २३६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दिवसभरात ९ हजार ९०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशात सध्या १ लाख ०३ हजार ८५९ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात देखील ओमीक्रॉन व्हेरिएंटचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाने राज्यातील टास्क फोर्स, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. राज्यात गेल्या २४ तासांत ८३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ८४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्याच सध्या ८ हजार १९३ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

दरम्यान, परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग वेग ५ पटीने अधिक असल्याने काळजी घेण्याची अत्यंत गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, ओमीक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रमित करत आहे. या व्हेरिएंटबाबत आणखी अभ्यास सुरु आहे. त्याबाबत काही माहिती समोर आली तर त्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यात येतील. आम्ही सतर्कता बाळगून आहोत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची ७२ तासांपूर्वीची RTPCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे.