CoronaVirus Live Updates : मे महिना ठरला धडकी भरवणारा! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, रेकॉर्ड मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 12:06 PM2021-06-01T12:06:25+5:302021-06-01T12:32:57+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मे महिना सर्वात धोकादायक ठरला आहे. नवीन रुग्ण आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 16 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागल आहे. कोरोनापुढे अनेक प्रगत देश हतबल झाले आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

देशात एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी आणि कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरल्याचे चित्र आहे.

आज जून महिन्याच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 27 हजार नवे रुग्ण सापडले असून, 2 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 1 लाख 27 हजार 510 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजेच या 24 तासांत तब्बल 2 लाख 55 हजार 287 जणांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.

गेल्या अनेक दिवसांनंतर देशात प्रथमच कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूंचा आकडा तीन लाखांच्या खाली आला आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 2 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मे महिना सर्वात धोकादायक ठरला आहे. नवीन रुग्ण आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त मे महिन्यात कोरोनाच्या 90.3 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महिन्याच्या शेवटी थोडासा दिलासा मिळाला. मात्र तरीही एप्रिलच्या तुलनेत 30% जास्त आहे. एप्रिल महिन्यात एकूण 69.4 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच मे महिन्यात जवळपास एक लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

मृतांचा हा आकडा खूपच जास्त असून एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे. जगातील सर्वात वाईट कोरोना महिन्याबद्दल बोलायचे मे आधी तर डिसेंबर महिना अमेरिकेसाठी सर्वात धोकादायक ठरला.

डिसेंबरमध्ये अमेरिकेत एकूण 65.3 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षाच्या जानेवारीत अमेरिकेसाठी मृत्यूचा आकडा सर्वात धोकादायक होता. यावर्षी जानेवारीमध्ये कोरोनाने अमेरिकेत 99,680 लोकांचा बळी घेतला.

डिसेंबर महिन्यात, अमेरिकेत 83,849 लोकांनी आपला जीव गमावला. त्याच वेळी, या वर्षाचा एप्रिल हा मृत्यूच्या बाबतीत ब्राझीलसाठी सर्वात खराब महिना ठरला. यावर्षी एप्रिलमध्ये ब्राझीलमधील कोरोनामुळे 82,401 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.

कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत असताना मृतांचा आकडा वाढत असल्यामागचं नेमकं कारण आता तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना आकडेवारीनुसार, 9 मे नंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्या कमी होत आहे.

पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. चंद्रकांच लहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्येत कमी पाहायला मिळत असली तरी मृतांच्या आकड्यावर याचा परिणाम हा 14 दिवसांनंतर पाहायला मिळेल.

संसर्गाचे हे एक चक्र आहे. दुसऱ्या देशामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये देखील काही दिवसांनी कोरोना मृतांच्या संख्येत घट झाली आहे. 9 मे पासून भारतात कोरोनाचा ग्राफ खाली येत असलेला पाहायला मिळत असल्याचं लहारिया यांनी म्हटलं आहे.