CoronaVirus Live Updates : बापरे! देशात कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय?; 'या' ठिकाणी 2 शाळेतील 5 विद्यार्थी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:53 AM2022-04-11T11:53:35+5:302022-04-11T12:14:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 861 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,21,691 आपला जीव लोकांना गमवावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काही महिने देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालये ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं.

देशात कोरोनाचा वेग मंदावलेला पाहायला मिळत असताना आता काही ठिकाणी कोरोना पुन्हा एकदा हात-पाय पसरत असल्याचं दिसत आहे. गाझियाबादच्या दोन शाळेतील पाच मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

तीन मुलं ही एकाच शाळेतील आहेत. तर दोन मुलं ही दुसऱ्या शाळेतील आहेत. मंगलम शाळेतील तीन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले असून शाळा प्रशासनाने याची माहिती दिली आहे. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शाळा सॅनिटाईझ करण्यात आली आहे. तसेच ऑफलाईन क्लास बंद करण्यात आला असून ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आल्याची माहिती शाळेने दिली आहे.

इंदिरापुरमच्या सेंट फ्रांसिस शाळेचे दोन विद्यार्थी याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांनी ऑनलाईन क्लासच सुरू असल्याचं सांगितलं. तसेच काही दिवस ऑफलाईन क्लास घेतले जाणार नसल्याची माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

साप्ताहिक रुग्णसंख्येच्या आकडेवारीतूनही देशातील कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसत आहे. मात्र देशातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. दोन्ही राज्यांत ज्या प्रकारे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्यावरून चौथ्या लाटेबाबतची भीती पुन्हा एकदा वाढू लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू आहे. तसेच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा दीडशेच्या जवळ पोहोचला आहे. दिल्लीमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीमध्ये 26 टक्के तर हरियाणामध्ये 50 टक्के एवढी प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे.

दिल्लीमध्ये आठवडाभरात 26 टक्के रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. तिसरी लाट ओसरून संसर्गात घट झाल्यानंतर गेल्या सात दिवसांत 751 वरून 943 रुग्णांची नोंद झाली आहे. चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा 1 टक्क्याच्या वर नोंदवला जात आहे.

दिल्लीसारखीच परिस्थिती हरियाणामध्येही आहे. येथेही कोरोनाच्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्ली शेजारील राज्य असलेल्या हरियाणामध्येही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली.

हरियाणामध्ये गेल्या आठवड्यातील 344 रुग्णांवरून तब्बल 50 टक्क्यांची वाढ होत या आठवड्यात 514 रुग्णांची नोंद झाली. देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही 4 कोटी 30 लाख, 35 हजारांवर गेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.