CoronaVirus Live Updates : बापरे! लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं निघाली कोरोना संक्रमित; रिपोर्टमधून धडकी भरवणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:06 AM2021-06-10T09:06:17+5:302021-06-10T09:13:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : तिसरी लाट येण्याची शक्यता असून ती लहान मुलांसाठी सर्वात जास्त धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 17 कोटींचा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

कोरोनाबाबत जगभरात सुरू असलेल्या रिसर्चमधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळाला. तर येत्या काही महिन्यांत तिसरी लाट येण्याची शक्यता असून ती लहान मुलांसाठी सर्वात जास्त धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कोरोना लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं कोरोना संक्रमित असल्याची माहिती समोर आली आहे,

लहान मुलांना लवकरात लवकर लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात चिमुकल्यांवर कोरोना लसीची ट्रायल सुरू होणार आहे. पण त्याआधीच याआधीच एम्सने (AIIMS) एक धक्कादायक खुलासा केला आहे.

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ज्या लोकांना निवडण्यात येतं, त्यांची सुरुवातीला आरोग्य चाचणी केली जाते. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, की नाही याबद्दलची तपासणी केली जाते. तसेच त्यांची कोरोना चाचणीही केली जाते.

एम्समध्ये ज्या लहान मुलांवर कोरोना लसीच्या ट्रायलआधी अशी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी बहुतेक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती आता स्क्रिनिंगमधून समोर आली.

टीवी 9 भारतवर्षने दिलेल्या माहितीनुसार, एम्स तर्फे देशातील 10 शहरांमध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं. या सर्वेक्षणातील रिपोर्टनुसार, देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच बरीच मुलं अशी होती ज्यांना कोरोना झाला होता मात्र, त्यांना त्याबद्दल माहिती नव्हती.

मुलांच्या पालकांनाही मुलांना कोरोना झाल्याची कल्पना नव्हती. या सर्व मुलांमध्ये मोठ्या लोकांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात संसर्ग, घशात संसर्ग यासारखी कोरोनाची गंभीर लक्षणं नव्हती. तर केवळ सर्दी, खोकला आणि ताप आला होता, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

जर एवढ्या मोठ्या संख्येने मुलांना कोरोनाचा संसर्ग होत आहे, तर त्यांच्यामध्ये नॅचरल इम्युनटी तयार झाली नसेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याचं उत्तर हो असेल तर लसीची गरज काय? या प्रश्नाचं एम्सचे वॅक्सिन प्रोग्रामचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी दिलं आहे.

मुलांना सौम्य संसर्ग होतो हे निश्चित आहे. मात्र, ते गंभीर झाल्यास लसीचा किती फायदा होऊ शकतो, याची माहिती मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे या मुलांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण गरजेचं आहे असं डॉ. संजय राय यांनी म्हटलं आहे.

जन्मानंतरच्या पहिल्या पाच वर्षांत लहान मुलांना अनेक लसी दिल्या जातात. या लसींमध्ये फ्लूची लसदेखील असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास या लसींमुळे मुलांमध्ये केवळ सौम्य लक्षणं दिसत असतील, अशी शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. मात्र या लाटेपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

तिसऱ्या लाटेत तरुणांना संसर्गाचा धोका अधिक आहे, असं व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. देशातील महामारीबाबत तज्ज्ञांनी अतिशय स्पष्ट संकेत दिले आहेत. कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य आहे. ही लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे.

शास्त्रज्ञांच्या आणि उद्योगांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बँक, ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी उद्योग उभे करून महामारीचा यशस्वीपणे सामना केला. रेल्वे, विमानतळं, लिक्वीड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी सैन्य दलांचा उपयोग केला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशातील व्यवस्थापन चांगले होते. यामुळेच दुसऱ्या लाटेला लवकर नियंत्रित करण्याचा विश्वास आपल्याला मिळाला. दुसऱ्या लाटेतही कोरोना व्यवस्थापन म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन चांगले होते, असं म्हटलं आहे.