CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:35 IST2025-11-18T13:13:28+5:302025-11-18T13:35:37+5:30
Next Chief justice of India: देशाचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करत आहेत. या काळात त्यांनी दिलेले काही निकाल देशभर गाजले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यामूर्ती सूर्य कांत यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश म्हणून ३० ऑक्टोबर रोजी नियुक्ती केली. २४ नोव्हेंबर रोजी सूर्य कांत पदभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती सूर्य कांत यांना सरन्यायाधीश म्हणून १५ महिन्यांचा काळ मिळणार आहे.

२२व्या वर्षी वकिलीमध्ये पाऊल ठेवलेल्या न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी अनेक पदावर काम केले आहे. हरयाणा सरकारचे महाधिवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २००४ मध्ये पहिल्यांदा त्यांची पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

मागील सहा वर्षाच्या काळात न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी अनेक महत्त्वाच्या खंठपीठामध्ये काम केले. कलम ३७० रद्द, आसाममधील नागरिकत्वाचा मुद्दा, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा ते पेगासस प्रकरणाची सुनावणी झालेल्या पीठामध्येही ते होते.

सगळ्यात जास्त चर्चा झाली ती २०२२ मधील नुपूर शर्मांच्या विधानावरील प्रकरणाची. भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात गु्न्हे दाखल झाले होते.

नुपूर शर्मा यांच्या अटकेला सूर्य कांत यांनी स्थगिती दिली होती आणि देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांची सुनावणी दिल्लीमध्ये घेण्याचा निकाल दिला होता.

या प्रकरणाबरोबरच अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणांचीही त्यांच्या पीठासमोर सुनावणी झालेली. कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शो वादात सापडला होता. याच प्रकरणात न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी रैनाला माफी मागण्याचे आदेश दिले होते.

















