भाजपाने तेलंगणाही जिंकले असते, परंतु ऐनवेळी स्वपक्षीयांनीच 'संजय'ला बंदी केले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 04:50 PM2023-12-03T16:50:57+5:302023-12-03T17:09:11+5:30

Telangana Election Result: जिंकलेले तेलंगणा भाजपाने गमावले, ४-० झाले असते, पण काँग्रेसला गिफ्ट देऊन टाकले

चार राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल लागले आहे. तीन राज्यांत भाजपा सत्तेत आली आहे, तर एक राज्य काँग्रेसला मिळाले आहे. जरी भाजपाला तेलंगणात एका जागेवरून सात जागा जिंकता आल्या असल्या तरी एक वेळ अशी होती की भाजपाने तेलंगणाही सर केले असते, पण एका चुकीने ते काँग्रेसला गिफ्ट दिल्यासारखे झाले आहे.

तेलंगणातील भाजपा नेते बंदी संजय कुमार यांनी भाजपसाठी मोठी जमिन तयार केली होती. याद्वारे पक्षाला कमीतकमी ४० जागा जिंकता आल्या असत्या. परंतू भाजपाने ऐन निवडणुकीवेळी त्यांच्याकडून महत्वाची जबाबदारी काढून घेतली आणि स्वत:चाच घात करून घेतला. दुसरीकडे भाजपमधूनच आलेल्या रेवंत रेड्डी यांच्यासोबत काँग्रेसने आपली नाव किनाऱ्याला नेऊन ठेवली.

बंदी संजय हे तेलंगणामध्ये अगदी कालपर्यंत भाजपसाठी काम करत होते. त्यांची तेलंगणामध्ये एक चांगली इमेज आहे. याच्या जोरावर बंदी संजय यांनी भाजपासाठी जमिन कसली होती. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांची दोनवेळा सार्वजनिक रित्या स्तुती केली होती. वयाच्या १२ व्या वर्षापासून ते आरएसएसशी जोडले गेले होते. परंतू, याच बंदी संजय यांना पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांनी घायाळ केले अन् ते भाजपाचे इथेच मोठे नुकसान झाले.

बंदी संजय यांना पक्षात नेहमीच बाहेरचा माणूस म्हणून पाहिले गेले. हैदराबाद पालिकेत त्यांच्याच जोरावर भाजपाला ४८ जागा जिंकता आल्या होत्या. बंदी संजय यांनी भाजपासाठी एवढी तयारू करून ठेवलेली की कसेही करून ४० जागा भाजपाला जिंकता आल्या असत्या. परंतू, विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांना बाजुला करण्यात आले. ही संधी साधून काँग्रेसने बीआरएस आणि भाजपाची मिलिभगत असल्याचे सांगत प्रचार केला आणि त्याला यशही मिळाले.

तेलंगणात बांधण्यात आलेल्या नवीन सचिवालयाच्या घुमट इमारतीवर मोठे राजकारण झाले होते. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास निजामाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा घुमट सचिवालयाच्या इमारतीतून हटवण्याचे आश्वासन बंदी संजय यांनी दिले होते. आम्ही असे बदल करू जे भारत आणि तेलंगणाच्या संस्कृतीचे प्रतीक असेल, असे ते म्हणाले होते. बंदी संजयच्या प्रजा संग्राम यात्रेने संपूर्ण राज्यात भाजपला मैदान तयार केले होते. लोकांना त्यांच्या गोष्टी आवडू लागल्या होत्या.

2020 मध्ये झालेल्या हैदराबाद कॉर्पोरेशन निवडणुकीत केवळ 48 जागा जिंकल्या नाहीत, तर बंदी संजय कुमार यांनी त्यानंतर झालेल्या तीन पोटनिवडणुकांमध्ये दोन जागा जिंकून केसीआर सरकारची झोप उडवली. यावेळी केसीआर यांचे प्रमुख सहकारी आणि राज्य सरकारचे मंत्री एटला राजेंद्र हे भाजपसोबत आले आणि तिथेच घात झाला. तेलंगणात भाजपवर वर्चस्वाची लढाई सुरू झाली. बंदी संजय आणि आटला यांच्यातील मतभेदांची पातळी इतकी वाढली की राज्य भाजपचे नुकसान होऊ लागले.

तेलंगणा भाजपात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्याची धुरा केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्याकडे सोपवण्यात आली. बंदी संजय यांच्या लोकांना रोखण्यात आले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत बंदी संजय देखील सक्रीय दिसले नाहीत. बंदी संजय यांच्या दोन मोठ्या विजयांमुळे केसीआर गाशा गुंडाळणार असे वातावरण तयार झाले होते. प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी आंदोलने, मोर्चे काढून ते वातावरण तसेच राहिल याची पूरेपूर काळजी घेतलेली.

परंतू, भाजपाच्या काही चुकीच्या निर्णयांनी बंदी संजय बाजुला झाले आणि तिच संधी काँग्रेसने साधली. भाजपा नरम पडू लागतेय हे पाहताच काँग्रेसने भाजपातून आलेल्या रेवंत रेड्डी यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली. तसेच त्यांना फ्री हँडही देण्यात आला. याचा फायदा काँग्रेसला झाला. नाहीतर आज तेलंगणाही भाजपाकडेच असले असते.