हद्दच झाली! इयत्ता ६ वी पास भाजप आमदार झाला डॉक्टर; कोविड वॉर्डात रुग्णांना दिलं इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:23 PM2021-05-23T18:23:27+5:302021-05-23T18:29:07+5:30

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना लोकांची मदत करायची सोडून काही नेते केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. आता हेच प्रकरण पाहा...

जनतेत आपली प्रतिमा चांगली राहावी आणि प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकीय नेते काय करतील याचा काही नेम नाही. असंच एक प्रकरण गुजरातच्या सूरतमध्ये समोर आलं आहे. एक इयत्ता सहावी उत्तीर्ण असलेला भाजप आमदार डॉक्टर बनलाय.

कोरोना रुग्णांसाठीच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी कोविड रुग्णालयात पोहोचलेले भाजप आमदार चक्क डॉक्टरच्या भूमिकेत गेले. इतकंच काय तर हातात इंजेक्शन घेऊन ते रुग्णांना देण्याचाही प्रताप या महाशयांनी केला आहे.

सोशल मीडियात भाजप आमदाराचे हे कारनामे व्हायरल झाल्यानंतर जोरदार टीका केली जात आहे. सूरत येथील सरथाना परिसरातील एका आयसोलेशन सेंटरमध्ये भाजपचे आमदार व्हीडी झालावडिया परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले

कोविड वॉर्डात रुग्णांवर उपचार सुरू असतानाच हे आमदार हातात सिरीन घेऊन थेट वॉर्डात गेले आणि रुग्णांवर उपचार करू लागले. इयत्ता ६ वी उत्तीर्ण असलेल्या झालावडिया यांनी नर्सच्या हातातून इंजेक्शन घेऊन ते भरलं आणि दिलं सुद्धा.

रुग्णांना देण्यात येणाऱ्या सलाइनमध्ये ते इंजेक्शन भरत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. याशिवाय काहींनी याचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केला आहे. या घटनेनंतर आमदार झालावडिया यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

टीका होत असल्याचं लक्षात आल्यानंतर झालावडिया यांनी यामागे काँग्रेसचा हात असल्याचं म्हटलं आहे. नाहक बदनामी करण्यासाठी काँग्रेसच्या लोकांकडून हे असे फोटो व्हायरल केले जात आहेत, असा आरोप झालावडिया यांनी केला आहे.

झालावडिया यांनी या घटनेवर स्पष्टीकरण देखील दिलं आहे. "गेल्या ४० दिवसांपासून मी या आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांना सेवा देत आहे. रुग्णांना देण्यासाठी जे रेमडेसिव्हीर इंजेक्शन सलाइनमध्ये मिस्क केलं जातं ते इंजेक्शन मी फक्त भरलं आहे. कोणत्याही रुग्णाला मी इंजेक्शन दिलेलं नाही. यावेळी माझ्यासोबत १० ते १५ डॉक्टर देखील तिथं उपस्थित होते", असं झालावडिया म्हणाले.

भाजपकडून वराछा आणि कामरेज विधानसभा मतदारसंघात संयुक्त स्वरुपात खूप मोठं काम केलं जात आहे. याला काँग्रेस नेते विरोध करत आहेत. त्यांना काहीच करायचं नाही फक्त टीका करुन नाहक बदनामी करण्याचा त्यांचा डाव आहे, असंही झालावडिया म्हणाले आहेत.