Bihar Political Update: नितीश कुमार भाजपाला शॉक देणार? ११ ऑगस्टपर्यंत बिहारमध्ये सत्तांतर अटळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 10:48 PM2022-08-07T22:48:38+5:302022-08-07T23:03:43+5:30

Bihar Political Update: येत्या ११ ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचं सरकार कोसळून पुन्हा एकदा आरजेडी आणि जेडीयू एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहारमधील राजकारण तापलं आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्य असलेल्या बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत बिहारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपा आणि जेडीयूमध्ये खटके उडत आहेत. त्यामुळे येत्या ११ ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचं सरकार कोसळून पुन्हा एकदा आरजेडी आणि जेडीयू एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहारमधील राजकारण तापलं आहे.

गेल्या महिनाभरापासूनच्या घटनाक्रमावर लक्ष घातल्यास नितीश कुमार आणि भाजपामध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसत आहे. महिनाभरात चारवेळा नितीश कुमार यांनी भाजपापासून अंतर ठेवल्याचं दिसून आलं. दोन आठवड्यांपूर्वी नितीश कुमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ३ ऑगस्ट रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

१७ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली तिरंग्याबाबत झालेल्या बैठकीला अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित होते. त्यानंतर २२ जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपसमारंभालाही नितीश कुमारांनी दांडी मारली. २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीलाही नितीश कुमार अनुपस्थित होते. तसेच आज झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीलाही नितीश कुमार यांनी दांडी मारली.

माजी केंद्रीय मंत्री आणि आरजेडीचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्याकडे जेडीयूने मालमत्तेबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते नितीश कुमार यांच्या मर्जीविरोधात केंद्रात मंत्री बनले होते. ते जेडीयूमध्ये असले तरी भाजपाचं काम करतात, असा दावा केला जात होता. नितीश कुमार यांना हा डाव लक्षात आल्याने यावेळी नितीश कुमार यांनी त्यांना राज्यसभेची संधी दिली नाही. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान, भाजपा आणि जेडीयूमध्ये येत असलेल्या दुराव्याचा अंदाज घेत आरजेडीने नितीश कुमार यांच्याबाबत आपली भूमिका मवाळ केली आहे. तसेच सर्व प्रवक्त्यांना नितीश कुमार यांच्यावर टीका न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच ११ ऑगस्टपूर्वी दोघेही बिहारमध्ये सरकार स्थापन करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, भाजपा आणि जेडीयूमध्ये येत असलेल्या दुराव्याचा अंदाज घेत आरजेडीने नितीश कुमार यांच्याबाबत आपली भूमिका मवाळ केली आहे. तसेच सर्व प्रवक्त्यांना नितीश कुमार यांच्यावर टीका न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच ११ ऑगस्टपूर्वी दोघेही बिहारमध्ये सरकार स्थापन करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, भाजपामध्ये अशी उलथापालथ होत असताना नितीश कुमार यांनी मंगळवारी पक्षाचे सर्व खासदार आणि आमदारांची पाटणामध्ये बैठक बोलावली आहे. त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

या सर्वांवरून भाजपा आणि जेडीयूमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र जेडीयूकडून दोन्ही पक्षात सारं काही ठिक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच भाजपा आरसीपी सिंह प्रकरणावरही काही बोलणं टाळत आहे.