Atal Bihari Vajpayee : 'या' आठ गोष्टींमुळे कायम आठवणीत राहतील वाजपेयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 12:29 IST2019-08-16T12:16:46+5:302019-08-16T12:29:56+5:30

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. वाजपेयींच्या 'सदैव अटल' स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.
देशहितासाठी वाजपेयी यांचं योगदान अतुलनीय होतं. पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी भारताला दिलेल्या आठ अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील
शिक्षणाच्या अधिकाराचा रचला पाया
शिक्षणाचा अधिकार काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात अंमलात आला असला, तरी त्याची मुहूर्तमेढ अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रोवली गेली होती. ६ ते १४ या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणारं सर्व शिक्षा अभियान त्यांनी सुरू केलं होतं.
भारताला बनवलं अण्वस्त्रसज्ज राष्ट्र
अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता आणि सगळ्याच देशांना भारताची ताकद दाखवून देण्याच्या उद्देशानं अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने १९९८ मध्ये राजस्थानातील पोखरण इथे अणुचाचणी केली होती. अर्थात, हे अस्त्र भारत प्रथम वापरणार नाही, तर केवळ प्रत्युत्तरादाखल वापरेल, अशी भूमिकाही तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी जाहीर केली होती.
दूरसंचार-दूरसंवाद क्रांतीच्या पाठीशी वाजपेयींची दूरदूष्टी
देशातील दूरसंचार क्रांतीचा पाया भले माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात रचला गेला, पण अटल बिहारी वाजपेयींनी या क्षेत्राला खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' दाखवले. अनेक जाणकारही भारतातील मोबाईल क्रांतीचं श्रेय अटल बिहारी वाजपेयींना देतात.
भूकंप, चक्रिवादळातही जीडीपी भक्कम
अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर अनेक संकटं आली. एक प्रलयंकारी भूकंप, दोन चक्रिवादळं, ३० वर्षांतील भीषण दुष्काळ, गल्फ वॉर 2, कारगिल युद्ध आणि संसदेवर हल्ला झाला. परंतु, वाजपेयींच्या कणखर नेतृत्वामुळे जीडीपीला धक्का बसला नाही.
मैत्री महासत्तांशी अन् शेजाऱ्यांशी
इस्रायलसोबत राजनैतिक आणि लष्करी सहकार्यासाठी पुढाकार घेऊन अटल बिहारी वाजपेयींनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं होतं. त्यानंतर, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारतभेटीनं आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं वजन वाढलं. पाकिस्तानशी मैत्रीचे प्रामाणिक प्रयत्नही अटल बिहारींनी केले होते. दिल्ली-लाहोर बससेवा हे त्याचं प्रतीक होतं. पण, पाकिस्तानने दगा दिला होता.
मेट्रो आली हो अंगणी...
दिल्ली मेट्रो प्रकल्पाला मंजुरी आणि पहिल्या लाइनचं उद्घाटन अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात झालं होतं.
चांद्रयान-१... देश पोहोचला चंद्रावर
देश २००८ पर्यंत चंद्रावर जाण्यासाठी सज्ज होईल, अशी घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी केली होती. चांद्रयान-1 प्रकल्पावर त्यांनीच स्वाक्षरी केली होती. त्यानंतर, इस्रोने मागे वळून पाहिलेलं नाही.
देश जोडणारा सुवर्ण चतुष्कोण
भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प म्हणजे सुवर्ण चतुष्कोण. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली.