Corona Virus : कोरोनामुळे पुन्हा होताहेत मृत्यू, गंभीर परिस्थिती निर्माण होणार?; WHO चा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 01:52 PM2023-12-18T13:52:37+5:302023-12-18T14:16:44+5:30

Corona Virus : कोरोनाचा नवीन स्ट्रेन आता जगातील अनेक देशांमध्ये पसरू लागला आहे.

जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. एकीकडे लोक कोरोनानंतर आपलं आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट वेगवेगळ्या देशांमध्ये कहर करत आहेत.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन आता जगातील अनेक देशांमध्ये पसरू लागला आहे. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील देशांना कोविड-19 प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

जेव्हा कोरोना JN.1 चा नवीन सब-व्हेरिएंट वेगवेगळ्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा कोरोना प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. अशातच WHO ने हा सल्ला दिला आहे. हा BA.2.86 चा सब व्हेरिएंट आहे.

डब्ल्यूएचओने डॉ मारिया वान केरखोव यांचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यांनी कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागील कारणे स्पष्ट केली आहेत आणि घ्यायची खबरदारी याबद्दल देखील सांगितलं आहे.

व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना डब्ल्यूएचओने लिहिले की, डॉ. मारिया वान केरखोव यांनी सध्याच्या श्वसनाच्या आजारांमध्ये कोविड-19 आणि जेएन. 1 सबव्हेरिएंटबद्दल सांगितलं. डब्ल्यूएचओ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहे.

या सुट्टीच्या काळात तुमचं कुटुंब आणि मित्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी WHO च्या सार्वजनिक आरोग्य सल्ल्याचे पालन करा. अलीकडे अनेक कारणांमुळे श्वसन संक्रमण वाढले आहे. ज्यामध्ये सुट्टीच्या काळात वाढती गर्दी आणि इतर कारणांचाही समावेश आहे.

केरळमध्ये कोरोनाच्या या नवीन सब व्हेरिएंटचं पहिलं प्रकरण नोंदवले गेले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितलं की, 18 नोव्हेंबर रोजी 79 वर्षीय महिलेच्या नमुन्याची आरटी-पीसीआरद्वारे चाचणी करण्यात आली, जी पॉझिटिव्ह आली.

महिलेमध्ये इन्फ्लूएंझा सारखी आजाराची सौम्य लक्षणे होती आणि ती आधीच कोरोनाने ग्रस्त होती. सूत्रांनी सांगितलं की, सध्या देशातील 90 टक्क्यांहून अधिक कोरोना प्रकरणे गंभीर नाहीत आणि बाधित लोकांना त्यांच्या घरात क्वारंटाईन ठेवण्यात आलं आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन म्हणाले की, भारतात सात महिन्यांनंतर कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. केरळमध्ये कोरोना रुग्ण आढळले असून ते गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे.

नवीन सबव्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यूके, आइसलँड, फ्रान्स आणि यूएस मध्ये पसरण्यापूर्वी JN.1 व्हेरिएंट प्रथम लक्झबर्गमध्ये ओळखला गेला. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, JN.1 व्हायरस एक सबव्हेरिएंट आहे. त्याला पिरोला असंही म्हणतात.

हे Omicron कडून येतं. CDC नुसार, कोरोना JN.1 चा नवीन सबव्हेरिएंट अमेरिकेतील नवीन कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी 15-29 टक्के आहे. अमेरिकेच्या पब्लिक हेल्थ एजन्सीने असंही म्हटलं आहे की JN.1 मुळे कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात.