१० नोव्हेंबरला भारत उचलणार मोठं पाऊल, जगाचं लक्ष; पाकिस्तानसह चीनही मागे हटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 03:40 PM2021-11-09T15:40:40+5:302021-11-09T15:47:52+5:30

Afghanistan Taliban Crisis: १५ ऑगस्टरोजी अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. अमेरिकन सैन्य मागे हटल्यानंतर अवघ्या काही दिवसांत तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं Taliban) कब्जा केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यात अनेक देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीचं सर्व देशांना निमंत्रण देण्यात आलं आहे. परंतु या बैठकीत निमंत्रण मिळूनही पाकिस्तानपाठोपाठ आता चीननेही सहभाग घेण्यास नकार दिला आहे.

चीनचं म्हणणं आहे की, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवरील चर्चेत ते सहभागी होणार नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांनुसार चीनने भारताने पाठवलेल्या निमंत्रणावर भाष्य केले आहे. या बैठकीची वेळ नियोजित कार्यक्रमात बसत नसल्याचं कारण चीनने दिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारतासोबत बहुपक्षीय आणि द्विपक्षीय चर्चेसाठी तयार आहे. परंतु ही वेळ योग्य नाही असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे चीनचा मित्र पाकिस्ताननेही भारताचं निमंत्रण फेटाळलं आहे.

पाकिस्तानचा निर्णय दुर्दैवी आहे परंतु आश्चर्यकारक नाही. अफगाणिस्तानला पाकिस्तानचा तारणहार पाहण्याची मानसिकता यातून दिसून येत असल्याचं म्हटलं जात आहे. या संमेलनात इराण, रशिया, उज्बेकिस्तान, कजाकिस्तान, तुर्केमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानचे प्रतिनिधी सहभागी होतील.

या बैठकीला अफगाणिस्ताला निमंत्रण न देण्यावरुन सांगितले गेले की, बैठकीत सहभागी होणाऱ्या ८ देशांपैकी कुणीही अफगाणिस्तानात तालिबानी सरकारला मान्यता दिली नाही. भारतानेही अद्याप तालिबानी सरकारला मान्यता दिली नाही. त्यासाठी अफगाणिस्तानला बैठकीचं आमंत्रण पाठवण्यात आले नाही.

NSA पातळीवरील या संमेलनात(NSA Level Regional Conference on Afghanistan) फक्त अफगाणिस्तानशी सलग्न असलेल्या देशांनाच नव्हे तर आशियाई खंडातील अन्य देशांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

या संमेलनाचं अध्यक्ष भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल(Ajit Doval) असतील तर संमलेनाचं आयोजन १० नोव्हेंबरला नवी दिल्लीत होणार आहे. बैठकीसाठी रशिया, इराण, मध्य पूर्व आणि मध्य आशियातील देशांनी सहभाग घेणार असल्याचं सांगितले आहे.

यापूर्वी २०१८ आणि २०१९ मध्ये इराणने अशाप्रकारच्या संमेलनाचं आयोजन केले होते. पाकिस्तानने त्यातही सहभाग घेतला नव्हता. चीनने त्या संमेलनात भाग घेतला होता. उद्या भारतात होणाऱ्या या संमेलनात सहभागी असणारे विविध देशांचे NSA भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांचीही भेट घेणार आहेत

दरम्यान, चीनमध्ये सध्या वेगळीच चर्चा सुरु आहे. याठिकाणी चीन तैवानसोबत युद्ध करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे चीनने अलीकडेच नागरिकांना अत्यावश्यक सामानांचा साठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता चीनमधील सुपर मार्केटमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते.