Aadhaar कार्डासोबत जोडलेला मोबाईल नंबर बंद झालाय?, काळजी करू नका; असा बदला नवा नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:41 PM2021-03-15T16:41:31+5:302021-03-15T16:48:20+5:30

पाहा कशी आहे ही प्रोसेस

सध्या देशात बहुतांश गोष्टींसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. आधार कार्डासोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांकही तितकाच महत्त्वाचा असतो.

अशा परिस्थितीत तुम्ही आधार कार्डाशी संबंधित कोणतंही काम केलं तर त्याचा येणारा ओटीपी हा तुमच्या नोंदणी केलेल्या क्रमांकावरच येत असतो.

परंतु जर तुमचा आधार कार्डासोबत लिंक केलेला मोबाईल क्रमांक जर बंद झाला असेल तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधारकार्डच्या माध्यमातून १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक दिला आहे.

यात मोबाइल क्रमांक, पत्ता, नाव, वैवाहिक स्थिती अशी सर्व माहिती तुम्हाला अपडेट करता येऊ शकते.

माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र दाखवणं आवश्यक असतं. पण तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करायचा झाल्यास कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.

UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊन तुमच्या नजिकच्या आधार केंद्राची माहिती मिळवा. आधार केंद्रामध्ये जाण्यासाठी तुमच्या सवडीनुसार अपॉइंटमेंट बुक करा.

अपॉइंटमेंटनुसार निश्चित वेळेवर आधार केंद्रात पोहचा. आधार केंद्रावर दिला जाणारा Aadhaar Update Form भरा.

मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नाही.

फक्त फॉर्म भरुन आधार केंद्रावरील अधिकाऱ्याकडे द्या आणि निश्चित करण्यात आलेले शुल्क भरा. आधार कार्डाबाबत कोणतेही बदल करण्यासाठी ५० रूपये शुल्क आकारलं जातं.

आधार केंद्रातील अधिकाऱ्याकडून तुम्हाला एक स्लिप दिली जाईल. त्यावर URN नंबर लिहिला असेल.

या नंबरवरुन तुम्ही केलेल्या अर्जाच्या सध्याच्या स्थितीबाबत संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीनं पाहता येईल.

तसंच १९४७ या क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही अपडेट केल्याची स्थिती जाणून घेऊ शकता.