Corona News: 233 टक्के! केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट; राज्यपालांना म्यूटेशनची शंका

By हेमंत बावकर | Published: October 14, 2020 11:59 AM2020-10-14T11:59:11+5:302020-10-14T12:08:17+5:30

Corona Virus Second Wave in kerala: भारतात गेल्या काही आठवड्यांपासून दिलासा मिळालेला आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. पहिल्या लाटेवेळी सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडलेल्या केरळनेच चिंता वाढविली असून तिन जिल्हे कोझिकोडे 62.2 टक्के, त्रिसूर 61.9 आणि कोल्लममध्ये 57.9 टक्के नवीन रुग्ण सापडू लागले आहेत. ही आकडेवारी गेल्या 11 दिवसांतील आहे.

भारतात गेल्या काही आठवड्यांपासून दिलासा मिळालेला आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. ही घट 11 टक्के आहे. मात्र, दुसरीकडे केरळमध्ये गेल्या 4 आठवड्यांत 233 टक्के नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.

यामुळे सरकारची चिंता वाढली असून कोरोनाची दुसरी लाट आल्याची भीती सतावू लागली आहे. कोरोना काही संपण्याचे नाव घेत नसून पुन्हा डोके वर काढू लागला असल्याचे सांगितले जात आहे.

केरळचे राज्यपाल आऱिफ मोहम्मद खान यांनी देखील राज्यातील कोरोनाच्या नवीन लाटेवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की हे कोरोना व्हायरसचे म्युटेशन असू शकते. द टाईम्स ऑफ इंडियाला त्यांनी मुलाखत दिली आहे.

केरळ राज्यातील लोक मोठ्या संख्येने अन्य राज्ये तसेच परदेशात काम करतात. राज्यातील कोरोना संक्रमितांमध्ये या लोकांची मोठी संख्या आहे, जे बाहेरून आले आहेत, याशिवाय अन्य कारणेही आहेत, असे खान म्हणाले.

राज्यातील आरोग्य विभागाच्या सतर्कतेनंतरही काही भागांत व्हायरसचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. म्य़ुटेशनमुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये कोरोना व्हायरस अधिक खतरनाक झाल्याचे आढळले आहे. यामुळे पूर्णपणे सावध राहून मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या केल्या पाहिजेत असे ते म्हणाले.

म्युटेशन म्हणजे रुप बदलणे होय. कोरोना व्हायरस जर म्युटेशन करत असेल तर त्याचा अर्थ तो त्याच्या वेगवेगळ्या कॉपी बनवू लागला आहे. यामुळे त्याच्या वागण्यामध्ये बदल होत आहे. कोरोना व्हायरस संक्रमित पेशी या लाखोंमध्ये व्हायरस सोडतात. जे मूळ व्हायरसची हुबेहूब प्रतिकृती असतात.

जेव्हा या पेशी जेव्हा असे व्हायरस बनवितात तेव्हा कधी कधी चूक करतात. यामध्ये एक स्टेप चुकते. या प्रक्रियेला म्यूटेशन म्हटले जाते. कोरोना व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करतो तेव्हा हा म्युटेशनचा प्रकार सुरु राहतो.

जगभरात अशाप्रकारचे जवळपास 12 हजार म्यूटेशन सापडले आहेत. यामध्ये म्युटेशनचा एक D614G प्रकार जगभरात दिसून आला आहे. हा पहिल्यांदा चीन आणि जर्मनीमध्ये सापडला होता. मात्र, नंतर तो भारत, अमेरिका आणि युरोपमध्येही आढळल्याने चर्चेत आला.

कोणत्याही व्हायरसचे म्युटेशन होणे म्हणजे तो जास्त खतरनाक होतोय असा होत नाही. यामुळे घाबरण्याची गरज नसते. मात्र, याचा परिणाम औषध बनविण्यावर होते. कारण जर व्हायरसने रुप बदलले तर त्याच्या प्रोटिनवर बनविलेली लस कालबाह्य ठरते.

यामुळे जगभरासाठी एकच लस तयार करणे खूप आव्हानात्मक ठरते. सध्या एकाच प्रकारचे म्युटेशन सापडल्याने संशोधकांना लस बनविणे सोपे झाले आहे.