Coronavirus News: देशात २ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:54 AM2021-05-26T10:54:47+5:302021-05-26T11:07:02+5:30

Coronavirus News: गेल्या २४ तासांत तब्बल ४१५७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

देशात दिवसभरात २ लाख ०८ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ वर पोहचली आहे. देशात सध्या २४ लाख ९५ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली आहे.

देशातील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मात्र मृतांचा आकडा चिंता वाढवणारी आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४१५७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३ लाख ११ हजार ३८८वर पोहचली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ वर पोहचली आहे. तर याच २४ तासांत तब्बल २ लाख ९५ हजार ९५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ४३ लाख ५० हजार ८१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी २४ हजार १३६ रुग्ण आणि ६०१ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

दिवसभरात ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या तीन लाख १४ हजार ३६८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्के असून, मृत्युदर १.६१ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या तीन कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर २० हजार ८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.

महाराष्ट्रात दिवसभरात नोंद झालेल्या ६०१ मृत्यूंपैकी ३८९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २१२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ६०१ मृत्यूंमध्ये मुंबई ३७, ठाणे ११, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ४, पालघर ५, वसई विरार मनपा ५, रायगड २८, पनवेल मनपा २, नाशिक १३, नाशिक मनपा १०, मालेगाव मनपा १, अहमदनगर २१, अहमदनगर मनपा ४, जळगाव ६, नंदुरबार २, पुणे १०६, पुणे मनपा २५, सोलापूर ४२, सोलापूर मनपा १४, सातारा १७, कोल्हापूर २६, कोल्हापूर मनपा ४, सांगली २०, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग १६, रत्नागिरी २१, औरंगाबाद ८, औरंगाबाद मनपा ३, जालना ६, परभणी २, परभणी मनपा १, लातूर ११, लातूर मनपा १, उस्मानाबाद १३, बीड १४, नांदेड ५, नांदेड मनपा ३, अकोला ६, अकोला मनपा ३, अमरावती १२, अमरावती मनपा २, यवतमाळ ५, वाशिम ९, नागपूर ८, नागपूर मनपा १०, वर्धा ६, भंडारा ५, गोंदिया ६, चंद्रपूर ९, चंद्रपूर मनपा ३ इ. रुग्णांचा समावेश आहे.