CoronaVirus Update : 'या' 10 राज्यांत कोरोनाचा कहर, महाराष्ट्रासह तीन राज्यांची स्थिती सर्वात वाईट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:25 PM2021-04-13T16:25:04+5:302021-04-13T16:40:26+5:30

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकेडवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 1 कोटी 36 लाख 89 हजार 453 वर पोहोचली आहे. यांपैकी 1 लाख 71 हजार 58 जणांचा मृत्यू झाला आहे. (CoronaVirus : maharashtra chhattisgarh and up has most no of cases and deaths)

भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 61 हजार 736 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 879 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील 16 राज्यांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 24 तासांत समोर आलेल्या रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या सर्वाधिक आहे. एवढेच नाही, तर याच तीन राज्यांत सक्रिय रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकेडवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 1 कोटी 36 लाख 89 हजार 453 वर पोहोचली आहे. यांपैकी 1 लाख 71 हजार 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही वाढून 12 लाख 64 हजार 698 वर पोहोचली आहे. एकूण संक्रमितांचा विचार करता ही संख्या 9.24% एवढी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 16 राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पंजाब, केरळ, तेलंगणा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल, यांचा समावेश आहे.

गेल्या 24 तासांत समोर आलेल्या रुग्णांत 81% रुग्ण केवळ दहा राज्यांतच नोंदवले गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील तब्बल 51,751 नवे रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत.

यानंतर, उत्तर प्रदेशात 13,604, छत्तीसगडमध्ये 13,576, दिल्लीत 11,491, कर्नाटकमध्ये 9,579, तामिळनाडूमध्ये 6,711, मध्य प्रदेशात 6,489, गुजरातमध्ये 6,021, राजस्थानमध्ये 5,771 आणि केरळमध्ये 5,692 नवे रुग्ण समोर आले आहेत.

याच प्रकारे गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांत 88% रुग्ण केवळ 10 राज्यांतील आहेत. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल 258 जणांचा मृत्यू झाला.

याशिवाय गेल्या 24 तासांत, छत्तीसगडमध्ये 132, उत्तर प्रदेशात 72, दिल्लीत 72, गुजरातमध्ये 55, कर्नाटकात 52, पंजाबमध्ये 52, मध्य प्रदेशात 37, राजस्थानात 25 आणि तामिळनाडूत 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात एकूण 12 लाख 64 हजार 698 सक्रिय रुग्णांपैकी, 69% रुग्ण केवळ पाच राज्यांतील आहेत. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 44.78% रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तर, छत्तीसगडमध्ये 7.82%, उत्तर प्रदेशमध्ये 6.45%, कर्नाटकमध्ये 6.01% आणि केरळमध्ये 3.79% सक्रिय रुग्ण आहेत. तर 31.15% सक्रिय रुग्ण हे देशातील इतर राज्यांत आहेत.

नवे कोरोना रुग्ण, मृतांची संख्या आणि सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. यानंतर छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. याच तीन राज्यांत कोरोना अत्यंत वेगाने हातपाय पसरत आहे.