झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:48 IST2025-07-25T11:05:38+5:302025-07-25T11:48:57+5:30

झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलीटीचे संचालक अमित साळुंखे यांना लाचलुचपत पथकाने रांचीमध्ये अटक केली आहे. अमित साळुंखे छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय आहे. सिंघानियांच्या चौकशीतून अमित साळुंखेवर एसीबीने अटकेची कारवाई केली आहे. याच अमित साळुंखेचा उल्लेख करत संजय राऊतांनी खळबळजनक दावा केला आहे.

अमित साळुंखेला झारखंडमधील पथकाने अटक केली आहे. त्याचे तिथल्या दारू घोटाळ्याशी संबंध आहेत तसेच महाराष्ट्रात मागे ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला त्यातही त्याचा समावेश आहे. १०८ रुग्णवाहिकेबाबत संशयास्पद निविदा आणि घोटाळे समोर आले. त्या रुग्णवाहिकेचे कंत्राट साळुंखेला देण्यात आले होते असा आरोप संजय राऊत यांनी केले आहे.

१०० कोटींचे रुग्णवाहिका निविदा ८०० कोटींपर्यंत गेली, त्या १०८ नंबर रुग्णवाहिकेचे कंत्राट सुमित फॅसिलिटीला दिले होते. त्याचे सूत्रधार अमित साळुंखे आहे. हा वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. हा अमित साळुंखे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा आर्थिक कणा आहे. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे शिंदेकडे वळवले. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला दिले याची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

झारखंडमधील मद्य घोटाळ्यात अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत ते शोधायचे आहे. हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत जोडले जातायेत असा दावाही संजय राऊत यांनी केला.

हे प्रकरण सोपे नाही. झारखंडमधून पथक येते आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाणार आहे. ८०० कोटींचा घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकलेत. कुठल्या मेडिकल फाऊंडेशनला हे पैसे गेलेत. निवडणुकीत कसे वापरले गेले. कुठून आले हे सगळं आता बाहेर पडणार आहे असं संजय राऊत म्हणाले.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहिम घ्यावीच लागतेय. मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचे आणि कुणाला काढायचे, वगळायचे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्‍याचा अधिकार असला तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शाहांकडे आहे असं राऊतांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेले परंतु त्यांचा मुख्य हेतू हा मंत्रिमंडळात जे गोंधळाचे वातावरण आहे. त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ते दिल्लीत आलेत. मंत्रिमंडळातील ४ मंत्री जाणार आहेत हे मी काही दिवसांपासून म्हणतोय. शिरसाट, कोकाटे, योगेश कदम, राठोड ही नावे पुढे येतायेत असं त्यांनी म्हटले.

मात्र ही ४ मंत्रीच नाही तर मंत्रिमंडळाचा पूर्ण चेहरा बदलून नव्या चेहऱ्याचे मंत्रिमंडळ आणावे अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्तुळात सुरू आहे. भ्रष्टाचार, शेतकरीविरोधी वक्तव्ये, लेडीज बार, घोटाळे, पैशाच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे त्यामुळे बिघडलेली प्रतिमा, हे ओझं फडणवीसांना झेपण्यापलीकडे गेले आहे असं संजय राऊतांनी सांगितले.

हे ओझं फडणवीसांना फेकताही येत नाही. खरेतर ज्यांचे १३७ आमदारांचे संख्याबळ आहे त्यांना अशाप्रकारच्या ओझ्याने वाकून जायची गरज नाही. तरीही मुख्यमंत्री वाकले आहेत तरीही ते त्यांचे काम करतायेत असं सांगत झारखंडमधील अमित साळुंखेच्या अटकेचे आणि शिंदे कनेक्शनचे संकेत राऊतांनी दिले आहेत.

झारखंड दारू घोटाळ्यात आतापर्यंत आयएएस अधिकारी विनय कुमार चौबे यांच्यासह ११ आरोपींना अटक केली आहे. मे २०२२ मध्ये छत्तीसगड मॉडेल धर्तीवर दारू विक्री सुरू झाली होती. त्यातूनच हा दारू घोटाळा उघड झाला. त्यात सुमित फॅसिलिटीचे अमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे.