Maharashtra Political Crisis: ४० गद्दारांना धडा शिकवणार! सेना शाखांचे जाळे विणणार; आदित्य ठाकरेंच्या हुकमी एक्क्याचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:11 AM2022-08-24T09:11:39+5:302022-08-24T09:18:34+5:30

Maharashtra Political Crisis: आगामी काळात युवासेनेच्या ५०० शाखा सुरू करणार असून, ४० गद्दार पुन्हा विधानसभेत जाणार नाही, याची खबरदारी युवासेना घेईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. इतकेच नाही, तर युवासेनाही कामाला लागली असून, आदित्य ठाकरेंनी आपली खास माणसे सक्रीय केल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेच्या ऐन संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा इराद्याने शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या सोलापूरच्या शरद कोळी यांच्यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. शरद कोळी यांच्या खांद्यावर आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या राज्य विस्तारकपदाची धुरा सोपवली आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर युवा नेते शरद कोळी यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन मोठं शक्तीप्रदर्शन केले. त्याच कामावर खूश होऊन आदित्य ठाकरे यांनी कोळींवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झालेल्या शरद कोळी यांनी राज्यभरात दौरे सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याचे मी निश्चितच सोने करून दाखवेन. शिवसैनिक आणि युवासैनिकांनी कामाला लागण्याचे आवाहन शरद कोळी यांनी केले.

तसेच ४० गद्दारांना धडा शिकवणारच आहे. ४० मतदारसंघात रात्रीचा दिवस करून काम करेन. राज्यभरात शिवसेनेच्या जास्तीत जास्त शाखा कशा होतील, यासाठी पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही शरद कोळींनी दिली. हे ४० गद्दार बंडखोर पुन्हा विधानसभेत जाणार नाही, याची खबरदारी युवासेना आता घेणार असल्याचा इशाराही दिला.

याशिवाय माझे धाडस संघटनेचे ५ हजार शाखा, हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी यांची एक महत्त्वाची बैठक घेऊन युवासेना आणि शिवसेनेच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून द्या, असे आवाहनही त्यांना केले असल्याचे शरद कोळी यांनी सांगितले.

आगामी काळात जिल्ह्यातील काही भागात युवासेनेच्या ५०० शाखा सुरू करणार असल्याचे शरद कोळींनी जाहीर केले. शिवसेनेचे खासदार तथा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी नुकताच सांगोला दौरा केला. यावेळी शरद कोळी यांच्या निवडीची घोषणा केली होती. निवड झाल्यापासून शरद कोळी यांनी सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर अशा तीन जिल्ह्यात युवासेनेचे कार्यक्रम घेत सभासद नोंदणी घेतली.

शरद कोळी यांनी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर अशा तीन जिल्ह्यात युवासेनेचे जंगी कार्यक्रम घेतले. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात युवासेनेचे कार्यालय स्थापन करून प्रत्येकाच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विचार पोहोचवीन, असा निर्धार कोळी यांनी केलाय.

तसेच उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या प्रत्येक जिल्हाप्रमुखाला, शहरप्रमुखाला, महिला आघाडी प्रमुखाला सोबत घेऊन युवासेनेचा विस्तार करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिथे कमी तिथे आम्ही म्हणत सोलापूरच्या शरद कोळी यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. गद्दारांना गाडण्याची शपथही पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंसमोरच घेतली.

सोलापूर जिल्ह्यात शरद कोळी यांच्या एंट्रीमुळे नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे. नदीकाठच्या मतदारसंघांमध्ये शरद कोळी यांचा संपर्क चांगला आहे आणि उद्धव ठाकरेंनाही याच मतदारसंघांमध्ये शिवसेनेला बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सोलापूर जिल्ह्यात शहाजी बापू पाटील हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांना आव्हान देण्याची शपथच शरद कोळीने घेतलीय. शरद कोळी यांनी ताकद लावली तर मोहोळ आणि दक्षिण सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला फायदा होईल, असे राजकीय जाणकार सांगतात.

उद्धव ठाकरेंची साथ सोडत चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने नवे सरकार स्थापन केले. त्या शिवसेनेच्या चाळीस आमदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार शरद कोळी यांनी केलाय.