विमा आणि गुंतवणूक एकत्र असावी का? तज्ज्ञांचा हा गुंतवणूक मंत्र नक्की लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:31 IST2026-02-09T15:03:41+5:302026-02-09T15:31:19+5:30

प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की आपल्या मुलाचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित असावे. यासाठी अनेकदा युलिप किंवा पारंपरिक विमा योजनांचा आधार घेतला जातो. मात्र, विमा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत करणे भविष्यात महागात पडू शकते. जर तुम्ही मुलांच्या नावे गुंतवणूक करू इच्छित असाल, तर स्मार्ट रणनीती आखणे गरजेचे आहे.

'वॉलेट वाईज'ने यासंबंधी तज्ज्ञांची मते जाणून घेतली. विशेषतः जे पालक युलिप किंवा पारंपरिक विमा योजनांकडे गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून पाहतात, त्यांच्यासंबंधी तज्ज्ञांशी बातचीत केली. तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, संरक्षणाची गरज (इन्शुरन्स) आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट (गुंतवणूक) कधीही एकत्र करू नका. विमा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ना पुरेसे विमा संरक्षण मिळते, ना महागाईच्या तुलनेत परतावा.

विमा असावाच, पण त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विम्याची नेहमीच आवश्यकता असते. पण त्यासोबत भविष्यातील तजवित करून ठेवण्यासाठी विविध घटकांमध्ये गुंतवणूकही करावी.

सक्षम रणनीती काय असावी? - टर्म प्लॅन निवडा: आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १२ पट विमा संरक्षण देणारा एक 'शुद्ध टर्म प्लॅन' ऑनलाइन खरेदी करा. हे तुमच्या कुटुंबाचे आर्थिक कवच असेल. 'एसआयपी'चा मार्ग : मुलांच्या भविष्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू करा. ८० टक्के इक्विटी फंड, १० टक्के सोने (गोल्ड फंड) आणि १० टक्के पीपीएफ असे गुंतवणुकीचे विभाजन ठेवा.

पर्यायांचे वास्तव - १) युलिप : यामध्ये गुंतवणुकीवर अनेक प्रकारचे छुपे शुल्क आकारले जातात, ज्यामुळे तुमचा निव्वळ परतावा कमी होतो. तसेच पाच वर्षांच्या 'लॉक-इन' कालावधीमुळे यामध्ये तरलतेचा अभाव असतो. २) पारंपरिक विमा योजना: या योजनांचा ऐतिहासिक परतावा केवळ ५ ते ६ टक्के राहिला आहे. वाढत्या महागाईचा विचार करता हा परतावा अत्यंत तोकडा ठरतो.

तज्ज्ञांचा हा गुंतवणूक मंत्र नक्की लक्षात ठेवा - सुरुवातीला इंडेक्स फंडासारख्या 'पॅसिव्ह फंडा'मधून गुंतवणुकीला सुरुवात करा. मुलाच्या वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर किती निधी हवा आहे, याचे नियोजन करून आजच गुंतवणूक सुरू करणे शहाणपणाचे ठरेल.