इनशर्ट, शूज अन् मास्क; पोलिस असल्याचं भासवायचा आणि...; पुण्यातील आरोपीबद्दल धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:54 IST2025-02-27T16:45:05+5:302025-02-27T16:54:23+5:30

तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिथं तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे.

पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीसोबत घडलेल्या घटनेनं राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

विकृत नराधमाने तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिथं तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे.

दत्तात्रय रामदास गाडे (३६, रा. शिक्रापूर) या सराईत गुन्हेगाराने पीडितेच्या अज्ञानाचा आणि भाबडेपणाचा गैरफायदा घेत, तिच्यावर अत्याचार केले.

गाडे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत.

नराधम दत्तात्रय गाडे याचा नेहमी स्वारगेट स्थानकात वावर असायचा. इनशर्ट, शूज, मास्क असा त्याचा पेहराव असायचा. पोलिस असल्याचे तो भासवायचा, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

२०१९ मध्ये दत्तात्रय गाडे याने कर्ज काढून एक चारचाकी कार विकत घेतली होती. या कारमधून तो पुणे-अहिल्यानगर या मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता.

पुणे-अहिल्यानगर या मार्गावर अंगावर जास्त दागिने असलेल्या एकट्या दुकट्या वृद्ध महिलेला लिफ्ट देत असे.

वृद्ध महिलांना घरून जेवणाचा डबा घ्यायचा आहे किंवा जवळच्या मार्गाने जाऊ, असे सांगून महामार्गाजवळ आडमार्गे निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेऊन त्या महिलेला तेथेच सोडून तो पलायन करत असे.

एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.

पोलिसांनी अटक केल्यानंतर गाडे याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले होते तर सुमारे १२ तोळे सोने जप्त केले होते.