सगळे एकत्र आल्यास जग जिंकणं शक्य- शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 06:47 PM2018-02-20T18:47:15+5:302018-02-20T20:00:16+5:30

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत 'मीडियाः शेपिंग द फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन अँड एन्टरटेन्मेंट' या विषयावर आज एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं.

चित्रपट (बॉलिवूड), टीव्ही, वेब, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी एकत्र येणं आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने राज्यात 'मीडिया हब' तयार करणं गरजेचं आहे, असं मत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यानं व्यक्त केलं.

मीडिया हे क्षेत्र वेगाने वाढत असून त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची ताकद मीडियामध्ये असल्याचा विश्वास सर्वच वक्त्यांनी व्यक्त केला.

आपला देश हा तरुणांचा देश आहे. या तरुणाईची चव 'ग्लोबल' झालीय आणि त्यात काहीच चुकीचं नाही. त्यामुळे 'दिल है हिंदुस्थानी' हे खरं असलं तरी मीडियानेही ग्लोबल व्हायला हवंय, अशी सूचनाही शाहरुखनं केली.

आपल्याकडे नव्या कल्पना, नवे विचार आहेत. त्याच्या जोडीला अद्ययावत तंत्रज्ञानही आहे. एकही देश असा नाही जिथे भारतीय माणूस पोहोचलेला नाही. त्याच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, असा ग्लोबल होण्याचा मार्गही त्यानं सांगितला.

या चर्चासत्रात बॉलिवूड दिग्दर्शक रितेश सिधवानी, व्हायकॉम 18चे ग्रूप सीईओ सुधांशू वत्स, रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी, लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे कन्टेंट हेड विजय सुब्रमण्यम हेही सहभागी झाले होते.