एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला संधी?; राज ठाकरेंशी 'फोन पे चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 10:44 AM2022-07-03T10:44:24+5:302022-07-03T10:47:37+5:30

राज्यातील विधान परिषदेच्या निकालानंतर अवघ्या १० दिवसांत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं, सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्याचसोबत त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

विधान परिषदेत शिवसेनेची काही मते फुटली. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. शिंदे यांच्यासोबत एक एक करत तब्बल ३९ आमदारांनी मविआ सरकारविरोधात भूमिका घेत शिवसेना पक्षनेतृत्वाविरोधात बंड पुकारलं.

सूरत, गुवाहाटी, गोवा यामार्गे अखेर शिंदे गट आणि शिवसेनेचे आमदार मुंबईत परतले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं असा दावा भाजपाने केला.

आता शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागेल याची चर्चा सुरू आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून कॅबिनेटमध्ये २ जागा देण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे मनसे मंत्रिमंडळात सहभागी होणार का हे पाहणं गरजेचे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत ३९ आमदार गेले. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ १६ इतके झाले आहे. मात्र आम्हीच शिवसेना आहोत, आमच्याकडे बहुमत आहे असा दावा शिंदे गट सातत्याने करत आहेत.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची बातमी आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि राज ठाकरेंच्या प्रकृतीबाबत शिंदे यांनी राज ठाकरेंची विचारपूस केली.

आता शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये मनसेला २ जागा देण्याची ऑफर केल्याची माहिती समोर येत आहे. रिपब्लिक इंडिया न्यूजनं हा दावा केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचंही सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे खूप जुने संबंध आहेत. आनंद दिघे यांच्या कारकिर्दीपासून राज ठाकरेंशी शिंदे यांची जवळीक आहे. ठाण्यात महापौर निवडणुकीतही मनसेनं शिंदे यांच्या विनंतीवरून शिवसेनेला मदत केली होती.

अलीकडेच आलेल्या धर्मवीर आनंद दिघे सिनेमातही आनंद दिघे यांनी आता हिंदुत्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर असं राज यांना संबोधित करत असल्याचा संवाद आहे. मात्र त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याचंही बोलले गेले होते.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज ठाकरे हे जुने शिवसैनिक आहेत. त्यांचे आणि शिंदे यांचे संबंध चांगले आहेत असं विधान केले होते.