ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 05:51 PM2024-05-26T17:51:52+5:302024-05-26T17:52:38+5:30

बेगुनिया विधानसभा मतदारसंघातील बोलागड ब्लॉकमधील कौनरीपटना येथील बूथ 114 वर शनिवारी ही घटना घडली.

bjp candidate prashant jagdev arrested vandalizing evm odisha bjp says politically motivated | ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी

ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी

ओडिशाच्या खुर्दा येथे ईव्हीएमची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपा उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ईव्हीएममधील बिघाडामुळे त्यांना मतदानासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले होते. त्यामुळे त्यांनी ईव्हीएमची तोडफोड केल्याचे समोर आले. बेगुनिया विधानसभा मतदारसंघातील बोलागड ब्लॉकमधील कौनरीपटना येथील बूथ 114 वर शनिवारी ही घटना घडली. ओडिशामध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. 

चिल्काचे भाजपा आमदार प्रशांत जगदेव यांना यावेळी खुर्डा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत जगदेव आपल्या पत्नीसह बूथवर गेले होते, मात्र ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मतदानासाठी काही वेळ थांबावे लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्यात आणि निवडणूक अधिकारी यांच्यात वाद झाला. यादरम्यान, त्यांनी टेबलवरून ईव्हीएम ओढले आणि ते खाली पडले आणि तुटले. 

निवडणूक अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार आमदाराला अटक करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी कायद्याव्यतिरिक्त प्रशांत जगदेव यांच्यावर आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने प्रशांत जगदेव यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या ते खुर्दा तुरुंगात आहेत, असे अविनाश कुमार यांनी सांगितले. 

निवडणूक अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत आमदाराने बूथवर गोंधळ घातला. तसेच, मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणून मतदान कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले, असा आरोप केला आहे. आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली आहे, असे अविनाश कुमार म्हणाले. दरम्यान, भाजपाच्या एका नेत्याने दावा केला की, प्रशांत जगदेव यांच्यावरील आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. निवडणूक अधिकाऱ्याने अनेक मतदारांशी गैरवर्तन करून आमदारासोबतही असाच प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला. 

दुसरीकडे, राज्याच्या सत्ताधारी बीजेडीनेही मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे तक्रार दाखल करून प्रशांत जगदेव यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बीजेडीचे प्रवक्ते सस्मित पात्रा यांनी आरोप केला की, प्रशांत जगदेव यांनी बूथमधील मतदान कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि नंतर भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या कारमध्ये लपून तेथून पळ काढला.

Web Title: bjp candidate prashant jagdev arrested vandalizing evm odisha bjp says politically motivated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.