By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:16 IST
1 / 12Konkan Railway Merger In Indian Railway Issue In Parliament: केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यानंतर महाराष्ट्र शासनानेही कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरणास मान्यता दिल्याने केंद्र सरकारने विलीनीकरणाचा निर्णय तातडीने घ्यावा. 2 / 12कोकण रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये लोकसभेत मांडला. हा प्रस्ताव लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 3 / 12कोकण रेल्वे ही १९९० च्या दशकात उभारलेली एक ऐतिहासिक व दूरदृष्टीपूर्ण रेल्वे योजना आहे. या प्रकल्पात भारतीय रेल्वेचा ५० टक्के तर उर्वरित संबंधित राज्यांचा सहभाग होता. मूळ करारानुसार कोकण रेल्वेचे १० वर्षांच्या आत भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण होणे अपेक्षित होते. मात्र, तीन दशके उलटून गेल्यानंतरही हे विलीनीकरण अद्याप प्रलंबित आहे.4 / 12केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनंतर महाराष्ट्र शासनानेही कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरणास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाची केवळ एकच मागणी होती की, या ऐतिहासिक रेल्वे प्रकल्पाचे नाव “कोकण रेल्वे” हे कायम ठेवावे आणि ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे.5 / 12सध्या कोकण रेल्वे आपल्या क्षमतेच्या सुमारे १७५ टक्के वापरात कार्यरत आहे. मात्र, स्वतंत्र महामंडळ (कॉर्पोरेशन) असल्यामुळे इतर रेल्वे झोनप्रमाणे केंद्र सरकारकडून तिला नियमित अर्थसंकल्पीय सहाय्य मिळत नाही. 6 / 12परिणामी, निधीअभावी सुमारे ३५० किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना तसेच पायाभूत सुविधा विकासाची अत्यावश्यक कामे रखडलेली आहेत. त्यामुळे नव्या रेल्वे ट्रेन सुरू करणेही अशक्य झाले असल्याचे, खासदार वायकर यांनी प्रस्तावाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणले आहे. 7 / 12सर्व संबंधित राज्यांची संमती प्राप्त झालेली असताना, आता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या विलीनीकरणामुळे कोकण रेल्वेला आवश्यक आर्थिक संसाधने उपलब्ध होतील.8 / 12कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू होईल आणि कोकण पट्ट्यातील प्रवासी, व्यापारी, पर्यटन तसेच एकूणच प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत मांडलेल्या आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे.9 / 12दरम्यान, मुंबई-कोकण मार्गासह संपूर्ण कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, तो मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. यात बोगद्यांचे मजबुतीकरण, रुळांचे अद्यावतीकरण यांसह अन्य तांत्रिक कामांचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने होणारे दुहेरीकरण पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेवरील प्रवासी ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार आहे.10 / 12कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी ५१५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली आहे.11 / 12या भरीव निधीमुळे कोकण रेल्वेच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार असून, या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीविषयी सांगितले. कोकण रेल्वे ही केवळ एक रेल्वे मार्ग नसून देशाच्या संपूर्ण किनारपट्टी भागाला जोडणारी एक महत्त्वाची जीवनवाहिनी आहे.12 / 12वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतूक लक्षात घेता, या मार्गाची क्षमता वाढवणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कोकण रेल्वेचा मार्ग भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. या मार्गावरील बोगद्यांचे मजबुतीकरण आणि ट्रॅकच्या जुन्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे.