हा आजार वेळेवरच ओळखा; नाहीतर डोळ्यांत इंजेक्शन देण्याची येईल वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:16 IST2026-02-19T19:08:33+5:302026-02-19T19:16:39+5:30

धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मात्र, मधुमेह केवळ रक्तातील साखरेपुरता मर्यादित नसून, तो शरीराच्या इतर अवयवांनाही पोखरत असतो. यात सर्वात जास्त फटका डोळ्यांना बसतो. रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित राहिल्यास डोळ्यांच्या पडद्याला गंभीर दुखापत होते, ज्याला 'डायबेटिक रेटिनोपॅथी' म्हटले जाते. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाला दृष्टी गमावण्याची आणि डोळ्यात महागडी इंजेक्शन्स घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे डोळ्याची वेळीच काळजी घेण गरजेचे आहे.

नाहीतर डोळ्यांत इंजेक्शन घेण्याची वेळ - आजाराचे वेळीच निदान न झाल्यास 'मॅक्युलर एडिमा' (पडद्याला सूज) निर्माण होतो. ही सूज कमी करण्यासाठी आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डोळ्यांत थेट 'अँटी-व्हीईजीएफ' प्रकारची इंजेक्शन्स द्यावी लागतात. ही प्रक्रिया खर्चिक असते. तसेच, काही वेळा लेझर ट्रीटमेंट किंवा व्हिट्रेक्टॉमी ही शस्त्रक्रियाही करावी लागते. हे टाळण्यासाठी साखर नियंत्रण आणि नियमित तपासणी हाच एकमेव मार्ग आहे.

रक्तातील साखरेचा नजरेवर घाला ! - मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढलेले राहिल्यास, डोळ्यांच्या पडद्याला (रेटिना) रक्तपुरवठा करणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्या कमकुवत होतात. या वाहिन्यांमधून रक्त किंवा द्रव पदार्थाची गळती झाल्यामुळे पडद्याला सूज येते. कालांतराने पडद्यावर नवीन पण कमकुवत रक्तवाहिन्या तयार होतात, ज्या फुटल्यामुळे डोळ्यांत रक्तस्त्राव होऊन दृष्टी कायमची जाऊ शकते.

डोळ्यांसमोर काळे ठिपके; नजर कमी होत जाते - दृष्टी अचानक धूसर किंवा अस्पष्ट होणे, डोळ्यांसमोर काळे ठिपके किंवा कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आकृत्या तरंगताना दिसणे, रंग ओळखताना गोंधळ होणे, रात्रीच्या वेळी दृष्टीमध्ये लक्षणीय घट होणे, वाचताना शब्दांवर लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे.

'डायबेटिक रेटिनोपॅथी'चा कोणाला जास्त धोका? - ज्यांना १० वर्षापेक्षा जास्त काळापासून मधुमेह आहे. ज्यांची 'एचबी एवन सी' पातळी सतत वाढलेली असते. बीपी, वाढलेले कोलेस्ट्रॉल असलेले रुग्ण.

नेत्रतज्ज्ञांकडून नियमीत डोळ्यांच्या पडद्याची तपासणी आवश्यक - अनेकांना वाटते की आपली दृष्टी स्पष्ट आहे म्हणजे डोळे सुरक्षित आहेत. मात्र, डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जेव्हा दृष्टी कमी होते, तेव्हा आजार प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो. त्यामुळे मधुमेहाचे निदान झाल्यापासून दर सहा महिने किंवा वर्षभरातून एकदा डोळ्यांच्या पडद्याची सखोल तपासणी करणे गरजेचे आहे.