पगाराच्या तुलनेत किती असावा होम लोनचा हप्ता ? ४० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरेल फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:44 IST2026-02-09T16:35:12+5:302026-02-09T16:44:50+5:30

स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. घरांच्या वाढत्या किमतींमुळे आजच्या काळात गृहकर्ज (होम लोन) घेणे अपरिहार्य झाले आहे. मात्र, कर्जाचा हप्ता (ईएमआय) ठरवताना अनेकदा मोठी चूक होते. त्याचा परिणाम भविष्यात कौटुंबिक बजेटवर होतो. अशा वेळी तुमचा ईएमआय तुमच्या पगाराच्या नेमका किती टक्के असावा, याचे गणित समजून घेणे आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण हप्ता भरतो, तेव्हा आपल्या पगारातील किंवा एकूण मिळकतीपैकी मोठी रक्कम जात असते. त्यामुळे कुटुंब चालवताना ओढाताण होऊ शकते. त्यामुळे घर घेण्याची तयारी करतानाच आपला पगार किती आणि आपण किती हजारांपर्यंतचा हप्ता भरू शकतो, त्याचे आर्थिक गणित आधीच मांडून ठेवायला हवे.

काय आहे '४० टक्क्यांचा' सुवर्णनियम ? - अर्थतज्ज्ञांच्या मते, गृहकर्जाचा हप्ता तुमच्या मासिक पगाराच्या ३५ ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. यालाच '४० टक्क्यांचा नियम' म्हटले जाते. उदाहरणार्थ, जर तुमचा पगार ८० हजार रुपये असेल, तर तुमचा हप्ता ३२ हजार रुपयांच्या आसपास असणे सुरक्षित आहे. यामुळे उरलेले ४८ ते ५० हजार रुपये तुम्ही घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि गुंतवणुकीसाठी वापरू शकता.

केव्हा वाढवू शकता हप्ता ? - काही विशेष परिस्थितीत तुम्ही पगाराच्या ५०-६० टक्क्यांपर्यंत ईएमआय ठेवू शकता. १. जर तुमच्यावर इतर कोणतेही कर्ज नसेल. २. तुमच्यावर कमी लोक अवलंबून असतील. ३. भविष्यात पगारात मोठी वाढ होण्याची खात्री असेल. पैसा जास्त हाती येणार असेल.

हप्ता जास्त असल्यास काय ? - जर तुम्ही पगाराच्या ६०-७० टक्के रक्कम केवळ ईएमआय भरण्यासाठी वापरली, तर इतर अत्यावश्यक गरजांसाठी पैशांची चणचण भासू शकते. अशा स्थितीत अनेकदा वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) घेण्याची वेळ येते. ज्यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. तसेच, गृहकर्ज हे २०-२५ वर्षांचे असते. या काळात व्याजदरात वाढ झाल्यास हप्ता वाढू शकतो, अशा वेळी तुमच्याकडे पुरेसा 'बॅकअप' असणे गरजेचे आहे.

सारांश: घर घेताना केवळ बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा विचार न करता, आपल्या खिशाला काय परवडेल याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. गृहकर्जाचा हप्ता मर्यादित ठेवल्यास तुम्ही मानसिक तणावाशिवाय घराचे स्वप्न पूर्ण करू शकाल. अन्यथा ओढाताण झाल्यावर अनेकांना घर घेतल्याचाही पश्चाताप होऊ शकतो.