सोने-चांदी दरवाढीचा ऐतिहासिक विक्रम ! यंदा भाव कितीवर जाणार? गुंतवणूक करावी का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 19:15 IST2026-01-23T19:07:50+5:302026-01-23T19:15:30+5:30
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठत सर्वसामान्यांच्या खिशावर ताण दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, गुंतवणूकदारांचा वाढता कल आणि मागणी-पुरवठ्यातील असमतोल यामुळे सोन्या-चांदीच्या दरवाढीचा वेग कायम आहे. सध्या सोने आणि चांदीने नवनवे विक्रम प्रस्थापित केले असून, याचा परिणाम लग्नसराईतील खरेदीवरही दिसून येत आहे.

गेल्या सहा महिन्यांतील सोने-चांदीतील दरवाढ - सहा महिन्यांपूर्वी चांदीचा दर सव्वालाख रुपये प्रतिकिलो होता, तर सोन्याचे दर प्रतितोळा ९० ते ९५ हजार रुपयांच्या दरम्यान होते.

यंदा भाव कितीवर जाणार? - भविष्यात सोने-चांदीचे दर वाढणार असून, चांदीचे दर ३.७५ लाख रुपये किलो तर सोन्याचे दर १.७० लाख रुपये प्रतितोळ्यावर जाण्याची शक्यता सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नवीन वर्षात सोने किती हजारांनी वाढले? - २०२६ सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात साधारण ८ ते १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सहा महिन्यांपासून चांदीचे दर तीनपटीने वाढत आहेत - सहा महिन्यांपासून चांदीचे दर सातत्याने वाढत असून, दररोज सात ते आठ हजार रुपयांनी भाव वाढत आहेत. सोन्याबरोबरच चांदीची खरेदीही कमी झाली आहे, अशी माहिती सोन्या-चांदीचे व्यापारी हिमान वस्तानी यांनी दिली.

सोने-चांदीत दरवाढीची काय कारणे ? - आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरमधील चढउतार, युद्धजन्य परिस्थिती, गुंतवणुकीसाठी सोने-चांदीकडे वाढता कल आणि पुरवठ्यावरील मर्यादा ही दरवाढीची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोने-चांदीच्या या दरवाढीचा मात्र सर्वसामान्यांना फटका बसत आहे.

















