मोबाइल पाहतांना जास्त जेवता? पोटाच्या 'या' आजारांना द्याल निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:32 IST2026-02-11T18:32:39+5:302026-02-11T18:32:39+5:30
अलीकडे मोबाइल, टीव्ही आणि लॅपटॉपशिवाय जेवण न करणारी जीवनशैली आरोग्यासाठी घातक ठरत आहे. धकाधकीच्या दिनचर्येमुळे अनेकजण स्क्रीनकडे पाहत घाईघाईने, तसेच नीट न चावता जेवण करीत आहेत. मात्र, या सवयीचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होत असून, पोट भरल्याचा संकेत मेंदूपर्यंत उशिरा पोहोचतो. परिणामी, आवश्यकतेपेक्षा अधिक अन्नसेवन केले जाते, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

स्क्रीन पाहत जेवण केल्याने पचनक्रिया बिघडते, रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित राहते आणि लठ्ठपणा, तसेच फॅटी रक्तदाब लिव्हरसारख्या गंभीर आजारांचा धोका उच्च वाढवतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी नमूद केले आहे. सावकाश आणि नीट चावून जेवण केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अन्न व्यवस्थित चावल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट भरल्याचा संकेत मेंदूला वेळेत मिळतो. गरजेपेक्षा जास्त भोजन टाळता येते व वजन नियंत्रणात राहते.

पोट भरल्याचा संकेत मेंदूला उशिराने मिळतो ! - पोट भरल्याचा संकेत मेंदूला उशिराने मिळाल्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न सेवन केले जाते. नीट न चावता आणि घाईघाईने जेवल्याने मेंदू-पोट यांचे समन्वय बिघडते.

लठ्ठपणा, फॅटी लिव्हर, हाय बीपी आजारांना निमंत्रण ! - चुकीच्या आहार सवयींमुळे लठ्ठपणा, फॅटी लिव्हर आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. पचनसंस्था बिघडल्याने चयापचयावर परिणाम होतो आणि हळूहळू जीवनशैलीशी संबंधित गंभीर आजार बळावत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यामुळे गरजेपेक्षा जास्त होते भोजन ! - मेंदूला पोट भरल्याचा संकेत वेळेत न मिळाल्याने अनेक जण गरजेपेक्षा अधिक अन्नसेवन करत आहेत. परिणामी, पचनसंस्थेवर ताण येत असून आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे.

भरभर जेवल्यामुळे बिघडते पचनक्रिया ! - भरभर आणि नीट न चावता जेवल्यामुळे पचनक्रिया बिघडते. अशा सवयीमुळे अन्न पचायला वेळ लागतो. दीर्घकाळात गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो.

















