काँग्रेसचा 'हा' मोठा चेहरा शिवसेनेत येण्यास इच्छुक होता?; आदित्य ठाकरेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 10:23 PM2022-08-24T22:23:09+5:302022-08-24T22:32:12+5:30

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता भाजपाचं प्रमुख लक्ष्य मुंबई महापालिका निवडणुकांवर आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा आमदारांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारावर टीका करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुंबईत देशातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार अमित साटम यांनी केला.

त्याच काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही आज शिवसेनेवर निशाणा साधत गेली ५ वर्ष मुंबईकरांना कुणी लुटलं याची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी देवरांनी केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर १२ हजार कोटी खर्च केले गेले, तो गेला कुठे? असा सवालही मिलिंद देवरा यांनी विचारला.

देवरा म्हणाले की, सत्य बाहेर येण्यासाठी सखोल चौकशी होणं गरजेचे आहे. मागील ५ वर्षात मुंबईकरांना कुणी लुटलं? महाराष्ट्र सरकारला बीएमसीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे अधिकार आहेत. परंतु त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती आहे का? असं देवरांनी विचारलं.

परंतु मिलिंद देवरांच्या आरोपावरून शिवसेनेही प्रतिक्रिया दिली आहे. देवरा माझे मित्र आहेत. ही मैत्री आणखी वाढवायची होती. परंतु त्यांच्या मनात जे होते ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही. देवरांनी निवडणुकीवरून काही स्वप्न होती. त्यात मी जाणार नाही. परंतु जी काही चौकशी करायची ती करा. आम्ही जनतेची सेवा केली आहे असं सांगत आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज्यसभा निवडणुकीसाठी मिलिंद देवरा शिवसेनेकडून इच्छुक होते हेच संकेत दिले.

त्याचसोबत आम्हाला मार्केटिंग करता आली नाही. मैत्री आहे तर निभवावी लागेल असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे माजी खासदार असून ते शिवसेनेतून राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते. परंतु ते पूर्ण न झाल्याने देवरा शिवसेनेवर असे आरोप करत आहेत असा दावा शिवसेना नेते खासगीत करत असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले. आदित्य ठाकरेंनी तेच संकेत दिलेत. त्याचसोबत मुंबईच्या वॉर्ड रचनेबाबतही मिलिंद देवरा यांनी चौकशीची मागणी केली होती.

काही दिवसांपूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच मुंबईतील नवी वॉर्ड रचना रद्द करण्याची मागणी केली. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचनेत फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे असा आरोप त्यांनी केला.

विधानसभेत आज शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही थेट आरोप करत म्हटलं की, वार्ड रचनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यातून हे वार्ड तोडले गेले. त्यात आर्थिक व्यवहार झाले अशी चर्चाही होती. चुकीच्या पद्धतीने वार्ड रचना झाली होती त्याची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदेंही याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावर बुधवारी विधानसभेत जोरदार चर्चा झाली. बीएमसीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या कामाचे कॅगमार्फत विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल.

शिंदे सरकारने केलेल्या या घोषणेमुळे शिवसेनेसाठी तणाव वाढणार आहे. बुधवारी विधानसभेत पालिकेच्या भ्रष्टाचाराचा आणि कारभाराचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. त्याच मुद्द्यावर बोलताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. कोविड घोटाळा, रस्ते घोटाळा, निवारा योजनेत भ्रष्टाचार, आभासी वर्गखोल्यांचे कंत्राट असे गंभीर आरोप विधानसभेत भाजप सदस्यांनी केले.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्यांची चौकशी करण्याची घोषणा केली. बीएमसीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या घोषणेने शिवसेनेचा ठाकरे गट यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.