प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:16 IST2025-11-20T12:57:48+5:302025-11-20T13:16:24+5:30

Bandra Madgaon Express Time Table Update 2025: कोकण रेल्वेवरील एका ट्रेनचा वेग वाढणार असून, तीन स्थानकांवरील वेळापत्रक बदलले आहे. नवीन वेळापत्रक सविस्तर जाणून घ्या...

Bandra Madgaon Express Time Table Update 2025: कोकण रेल्वे मार्गावर आता नियमित वेळापत्रक लागू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवासाचा वेग तर वाढला आहेच, शिवाय काही सेवाही वाढल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले होते. परंतु, यंदा पावसाळी वेळापत्रकाचे १५ दिवस कमी करण्यात आले.

New Time Table Of Bandra Madgaon Express 2025: कोकण रेल्वेवरील प्रवास म्हणजे प्रवाशांसाठी एक पर्वणीच. कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे म्हणजे एक मोठा आधार आहे. निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, बोगदे, मोठे पूल, नद्या-नाले, धबधबे यांनी कोकणाचा रेल्वे मार्ग अगदी नटलेला आहे. परंतु, एकच ट्रॅक असल्यामुळे अनेकदा या मार्गावर समस्यांचा सामना करावा लागतो. तरीही कोकण रेल्वे अगदी व्यवस्थितपणे वेळापत्रक पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करते.

२१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित ट्रेनच्या वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. भौगोलिकदृष्ट्या कोकण रेल्वेवरून ट्रेन, मालगाडी चालवणे आव्हानात्मक आहे.

मुंबईतील मध्य रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी अनेक ट्रेन आहेत. परंतु, पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित एक ट्रेन आहे. ही ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून सुटते आणि गोव्यातील मडगावला पोहोचते. वांद्रे ते मडगाव एक्स्प्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक १०११५ ही ट्रेन वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ०६ वाजून ५० मिनिटांनी सुटते आणि त्याच दिवशी रात्री मडगावला पोहोचते. आता या ट्रेनच्या रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग या तीन स्थानकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

वांद्रे मडगाव ही एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावर आधी दुपारी ०४ वाजून ०५ मिनिटांनी पोहोचून ०४ वाजून १० मिनिटांनी सुटत असे. परंतु, या स्थानकावर आता ही एक्स्प्रेस लवकर पोहोचणार आहे. आता ही ट्रेन रत्नागिरी स्थानकावर दुपारी ०३ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल आणि ०३ वाजून ४० मिनिटांनी सुटेल.

तसेच वांद्रे मडगाव एक्स्प्रेस ही ट्रेन कणकवली स्थानकात आधी सायंकाळी ०६ वाजून ४० मिनिटांनी पोहोचून ०६ वाजून ४२ मिनिटांनी सुटत असे. तर, आता नवीन वेळापत्रकानुसार, ही ट्रेन ०६ वाजता पोहोचेल आणि ०६ वाजून ०२ मिनिटांनी सुटेल.

याशिवाय वांद्रे मडगाव एक्स्प्रेस ही ट्रेन सिंधुदुर्ग स्थानकावर आधी सायंकाळी ०७ वाजता पोहोचून ०७ वाजून ०२ मिनिटांनी सुटत असे. तर आता नवीन वेळापत्रकानुसार, ही ट्रेन ०६ वाजून २० मिनिटांनी पोहोचून ०६ वाजून २२ निनिटांनी सुटेल.

प्रवाशांना २१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रकानुसार प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.