बाळासाहेबांचा आदेश, वेषांतर करून कर्नाटकात घुसले, त्यावेळचा हा कोण शिवसैनिक?; बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:57 IST2024-12-10T15:51:59+5:302024-12-10T15:57:03+5:30

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांचा प्रश्न अजूनही तडीस गेलेला नाही. सातत्याने हा विषय समोर येतो आणि चर्चेच्या धुरळ्यात शांत होऊ जातो.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. कर्नाटक सरकारने बेळगावात अधिवेशन बोलवलं असून, मराठी एकीकरण समितीने याला विरोध केला आहे. एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला आणि प्रशासनाकडून ते रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेच्या प्रवाहात आला.

यानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. छगन भुजबळांनी वेषांतर करून बंदी घालण्यात आलेली असताना कर्नाटकात प्रवेश केला होता. जुने फोटो शेअर करत भुजबळांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

"1986 साली कर्नाटक सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कन्नड भाषा सक्तीने लादली. मराठी भाषेचा आणि अस्मितेचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील मराठी बांधवांना असह्य झाला. याच अन्यायाविरुद्ध शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला आणि मराठी अस्मितेसाठी रणशिंग फुंकले. त्यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसैनिक बेळगावच्या भूमीत वेशभूषा करून प्रवेश केला, मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला", असे भुजबळ म्हणालेत.

"त्या काळात कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून बेळगावात जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. पण मराठी अस्मितेसाठी लढण्याची आमची जिद्द अडथळ्यांना भीक घालणारी नव्हती."

"आम्ही गोवा मार्गे बेळगावात दाखल झालो आणि आंदोलनाला बळ दिले. कर्नाटक सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली होती", असे भुजबळांनी शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला.

"आजही सीमावादाचा प्रश्न तसाच आहे, मराठी बांधव आजही आपल्या हक्कांसाठी झगडत आहेत. या मराठी बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे! 1986 च्या त्या ऐतिहासिक आंदोलनाची क्षणचित्रे आजही मराठी अस्मितेच्या संघर्षाची साक्ष देतात", असे भुजबळ म्हणाले.