निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:19 IST2025-07-16T13:12:19+5:302025-07-16T13:19:52+5:30

१० महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दमदार यश मिळाले. युतीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला. मात्र मुख्यमंत्रिपद आपल्यालाच मिळावे अशी भूमिका शिंदेसेनेने घेतली होती. त्यातून काही काळ या दोन्ही पक्षातील नाराजीनाट्य माध्यमात झळकले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मी नाराज नाही असं सांगत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.
महायुती सरकार राज्यात सत्तेत आहे मात्र आता सर्व पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुका महायुती म्हणून लढू असं सत्तेतले तिन्ही पक्ष सांगत असले तरीही ऐन निवडणुकीत काय होईल हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही.
एकीकडे भाजपाने पक्ष संघटनेत बदल करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षातील आमदारांच्या बैठका घेत आहेत. मतदारसंघातील प्रमुख कामे मार्गी लावत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत भाजपाची कामगिरी वरचढ ठरेल यासाठी पक्ष नेतृत्व काम करत आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही पक्षातील नेते, आमदारांच्या बैठकांचा सिलसिला सुरू केला आहे. शिंदे यांचे विशेष लक्ष मुंबई, ठाणे या महापालिकांवर आहे. याठिकाणी जास्तीत जास्त यश मिळावे असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यात मतांच्या गणिताची जुळवाजुळव शिंदे यांच्याकडून केली जात आहे.
त्यातच एक मोठी राजकीय घडामोड घडत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांची युती होणार आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांच्यासोबत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग केला होता.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती जाहीर केली होती. परंतु कालांतराने हा प्रयोग अयशस्वी ठरला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी एकटीच लढली होती.
त्यात भाजपासोबत रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे. आठवले यांनी महायुतीत कायम भाजपाची साथ दिली आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजपाने आठवले यांच्या पक्षासाठी १ जागा सोडली होती. आठवले स्वत: केंद्रात मंत्रिपदी आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत ते भाजपासोबतच राहतील यात शंका नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दलित मतांची बेरीज करण्यासाठी या चळवळीचे नेतृत्व करणारे सोबत हवेत अशी प्रमुख राजकीय पक्षांची धारणा असते. एकनाथ शिंदे यांनीही पक्ष संघटनेच्या दृष्टीने आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आनंदराज आंबेडकर यांची युती केवळ शिंदेंपुरती मर्यादित आहे की ते महायुतीचा घटक बनतील हे येणारा काळ ठरवेल.
आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आहेत. २०२० मध्ये त्यांनी वंचितमधून बाहेर पडून रिपब्लिकन सेनेची स्थापना केली. आता त्यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत युती करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांनी केली टीका - आनंदराज आंबेडकर लोकसभेपूर्वी आमच्याकडे आले होते. आमच्याशी चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर यांचे ऐकले जाते एवढेच आम्हाला माहिती आहे. आनंदराज आमचे मित्र आहेत, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. लोकसभेपूर्वी त्यांच्या आणि आमच्या बैठका झाल्या होत्या. त्यांना महाविकास आघाडीत यायचे होते. तेव्हा त्यांना भाजपासोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध ठेवायचे नव्हते अशी भूमिका होती. आता कसे संबंध ठेवतील पाहू असा टोला राऊतांनी शिंदे-आनंदराज आंबेडकर यांच्या युतीवर लगावला.