११ वेळा अर्थसंकल्प, विक्रमी ६ वेळा उपमुख्यमंत्रिपद, अजितदादांच्या झंझावाती आयुष्यातील १० टप्पे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:19 IST2026-01-29T09:24:47+5:302026-01-29T10:19:02+5:30

Ajit Pawar Death News: मागील ३५ वर्ष सक्रीय निवडणुकीच्या राजकारणात असलेल्या अजित पवार यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा इतिहास रचला. मात्र मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. दुसरीकडे अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवार हे राज्याच्या इतिहासातील दुसरे अर्थमंत्री ठरले आहेत.

मागील ३५ वर्ष सक्रीय निवडणुकीच्या राजकारणात असलेल्या अजित पवार यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा इतिहास रचला. मात्र मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. दुसरीकडे अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवार हे राज्याच्या इतिहासातील दुसरे अर्थमंत्री ठरले आहेत. शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. तर जयंत पाटील यांनी १० आणि सुशीलकुमार शिंदे यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झाले. तर त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. त्यांच्याकडे बी. कॉम. ही पदवी होती.

अजितदादांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९८२ मध्ये सहकार क्षेत्रातून केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते निवडून आले. बारामती परिसरात सहकार चळवळीचा प्रभाव असताना या क्षेत्रातील कामामुळे त्यांना ग्रामीण प्रश्नांची जवळून ओळख झाली. शरद पवारांचा राजकीय वारसा असला तरी तळागाळातील कामातून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर भर दिला.

१९९१ मध्ये अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हे पद केवळ आर्थिकच नव्हे, तर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णयांमध्ये सक्रिय भूमिका घेतली. या काळात त्यांची प्रशासकीय क्षमता आणि निर्णयक्षमता अधिक ठळकपणे पुढे आली.

याच वर्षी म्हणजे १९९१ मध्ये अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. ही त्यांची राष्ट्रीय राजकारणातील पहिली मोठी पायरी होती. मात्र, काका शरद पवार यांच्यासाठी जागा मोकळी करून देण्याच्या राजकीय निर्णयातून त्यांनी काही महिन्यांत राजीनामा दिला. या निर्णयामुळे पक्षनिष्ठा आणि काैटुंबिक राजकारणातील त्यांची भूमिका चर्चेत आली.

खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर १९९१ च्या पोटनिवडणुकीत अजितदादा बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर बारामती ही त्यांची राजकीय कर्मभूमी ठरली. सतत आमदार म्हणून निवडून येत त्यांनी येथे विकासकामांचा ठसा उमटवला आणि ‘बारामती पॅटर्न’ अधिक बळकट केला. १९९५ मध्ये अजितदादा बारामतीतून दुसऱ्यांदाच आमदार म्हणून निवडून आले अन् एका दीर्घ व प्रभावशाली कारकिर्दीची सुरुवात झाली.

१९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये अजितदादांना राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. अर्थ, सिंचन, ऊर्जा यांसारख्या खात्यांशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. या काळात ते आक्रमक प्रशासक आणि कडक निर्णय घेणारे मंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले. ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत सिंचन मंत्री. डिसेंबर २००३ ते ऑक्टोबर २००४ दरम्यान त्यांनी ग्रामविकास मंत्रिपद भूषवले. २००४ मध्ये बारामतीतून पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांनी जलसंपदामंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर २०१० मध्ये अजित पवार यांनी पहिल्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या टप्प्याने ते राज्याच्या सत्ताकेंद्रात निर्णायक स्थानावर पोहोचले. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी विशेषतः सिंचन आणि वित्तीय नियोजनावर भर दिला.

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे झालेल्या राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का दिला. अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, हे सरकार अवघे ८० तास टिकले. या घटनेमुळे अजित पवार यांच्या राजकीय डावपेचांवर देशभर चर्चा झाली आणि ‘पहाटेचा शपथविधी’ हा शब्दप्रयोग राजकीय इतिहासात नोंदला गेला.

दि. २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड बंड पुकारले. त्यांच्या समर्थक आमदारांसह त्यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सत्तासमीकरणाचा अध्याय सुरू झाला.

फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात अजित पवार यांच्या गटालाच मूळ ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह बहाल केले. या निर्णयामुळे पक्षातील वादाला अधिकृत कलाटणी मिळाली आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत नेतृत्व म्हणून पुढे आले. हा टप्पा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत निर्णायक मानला जातो.

२८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ गोजुबावी गावात एका खासगी चार्टर्ड विमानाला झालेल्या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले.