महाराष्ट्रात पडद्यामागे 'पॉवर गेम'! २ एप्रिलनंतर राजकीय चित्र बदलणार; नेमकं काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:55 IST2026-02-03T15:47:10+5:302026-02-03T15:55:38+5:30

बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाले. अजित पवारांच्या अचानक जाण्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. परंतु पडद्यामागे खरा पॉवर गेम अजूनही सुरू आहे.

अजित पवारांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा प्रखरतेने चर्चेत आला. त्यात शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांची अंतिम इच्छा दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण ही होती. त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात ८ ते १० बैठका झाल्या. गोविंदबागेतही अजित पवारांची शरद पवारांसोबत बैठक झाली. सगळे काही ठरले होते. फक्त घोषणा बाकी होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

मात्र महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी भाजपा व मित्रपक्षांच्या एनडीएच्या माध्यमातून राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीने दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरीत्या घेतला आहे. ही भूमिका पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. भाजपाप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः 'विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार याबाबत स्पष्टता आवश्यक असून त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. या जागेवर पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे शरद पवार राज्यसभेतून बाहेर पडतील आणि पवार कुटुंबातील तिसरी पिढी राज्यसभेत एन्ट्री घेईल अशी चर्चा सुरू आहे. अजित पवारांनीही त्यांच्या राजकारणाची सुरुवात दिल्लीतून केली होती. ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण १९ जागा आहेत. त्यातील १२ जागा एनडीए आणि ७ जागा महाविकास आघाडीकडे आहेत. त्यातील शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडे एकूण २ जागा आहेत. त्यात शरद पवार, फौजिया खान या राज्यसभा सदस्या आहेत. या दोघांचा कार्यकाळ येत्या २ एप्रिल २०२६ पर्यंत आहे. त्याशिवाय ठाकरे गटाच्या प्रियंका चर्तुवैदी यांचाही कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. काँग्रेसचे रजनी पाटील, भाजपाचे धैर्यशील पाटील, भागवत कराड यांचीही मुदत संपणार आहे. रामदास आठवले यांचीही मुदत २ एप्रिलला पूर्ण होतेय.

एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होणार आहेत. त्याशिवाय सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने एक जागा आधीच रिक्त झाली आहे. या जागेचा कार्यकाळ जुलै २०२८ पर्यंत बाकी आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. परंतु ही त्यांची शेवटची टर्म असेल अशी माहिती त्यांचे निकटवर्ती देतात.

२०२४ च्या विधानसभा निकालानंतर राज्यसभेत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे वर्चस्व वाढले आहे. भाजपाकडे एकूण १३२ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे ५७ आमदार आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ४० आमदार आहेत. विरोधकांमध्ये उद्धव ठाकरेंकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे १० आमदार आहेत.

राज्यसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील पॉवर गेम पडद्यामागून खेळला जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार राज्यसभेत जातील अशी चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणूक लढवतील की नाही याची स्पष्टता नाही. अजित पवार हयात असताना बारामतीत जय पवार निवडणूक लढवतील अशीही चर्चा होती. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत कोण उभे राहते हेदेखील पाहणे गरजेचे आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा यासाठीच जास्त रंगली जात आहे. शरद पवारांच्या डोळ्यादेखत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे ही अजित पवारांची अंतिम इच्छा आणि त्यांचा तीव्र आग्रह होता असं शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांनी म्हटलं. परंतु आता अजित पवार नाहीत. त्यामुळे विलीनीकरण होईल की नाही हेदेखील अधांतरित आहे.

तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे विलीनीकरणावर फार स्वारस्य दाखवत नाहीत. विलीनीकरणावर प्रफुल पटेल यांना प्रश्न विचारला असता मी आज जो माझा पक्ष आहे, त्याबद्दलच बोलणार. काल्पनिक कुठल्याही गोष्टी करणार नाही असं सांगत त्यावर भाष्य टाळले.

















