तिकीट १५० रुपयांचं, लॉटरी लागली ३६०० कोटींची; पैशांसाठी २९ वर्षे वाट पाहावी लागणार; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 08:17 PM2022-04-29T20:17:20+5:302022-04-29T20:27:05+5:30

अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली आणि १५० च्या तिकिटावर एका व्यक्तीला ३६०० कोटींची लॉटरी लागली. जाणून घ्या...

एखाद्या व्यक्तीला नशिबाची आणि भाग्याची साथ लाभली, तर तर तो व्यक्ती कुठल्या कुठे जाऊ शकते, याचे एक ताजे उदाहरण समोर आले आहे.

एका इसमाने केवळ १५० रुपये खर्च करून एक लॉटरीचे तिकीट काढले. त्या व्यक्तीला स्वप्नातही वाटले नसेल की, त्याला कोट्यवधींची लॉटरी लागेल. मात्र, अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली आणि १५० च्या तिकिटावर त्या व्यक्तीला ३६०० कोटींची लॉटरी लागली आहे.

अमेरिकेत लॉटरीमध्ये एका व्यक्तीने सुमारे ३६०० कोटी जिंकले आहेत. या अमेरिकन लॉटरीचे नाव 'पॉवरबॉल जॅकपॉट' आहे. विजेत्याने अमेरिकेतील ऍरिझोना येथे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. विजेत्याची ओळख अद्याप उघड झालेली नाही.

विजेत्याला जॅकपॉट बक्षिसाची रक्कम एकाच वेळी घ्यायची असल्यास, ती कमी केली जाईल. जेव्हा एखादी व्यक्ती पुढील २९ वर्षांत ३० वेळा पैसे घेण्यास तयार असेल तेव्हा त्याला ३६०० कोटी रुपये मिळू शकतात.

त्याच वेळी, हा जॅकपॉट एकरकमी म्हणून घेऊन त्याला २१६५ कोटी रुपये मिळतील. पॉवरबॉलची तिकिटे सुमारे १५० रुपयांना विकली जातात. ही तिकिटे अमेरिकेतील ४५ राज्यांमध्ये विकली जातात.

एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, जो कोणी विजेता असेल, तो इच्छित असल्यास त्याचे नाव गुप्त ठेवू शकतो. एरिझोना लॉटरीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हे जॅकपॉट तिकीट गिल्बर्टच्या क्विकट्रिपवर विकले गेले. मात्र, ही लॉटरी क्लेम करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.

एरिझोना लॉटरीचे प्रवक्ते जॉन टर्नर गिलीलँड म्हणाले की, कधीकधी अशा प्रकरणांमध्ये लोकांना काही दिवस लागतात. जेणेकरून तो कायदेशीर आणि आर्थिक तयारी करू शकेल.

जो विजेता असेल, तो त्याचे नाव गुप्त ठेवू शकतो, असेही ते म्हणाले. मात्र, त्याकडे १८० दिवसांची मुदत असून, त्यानंतर त्या व्यक्तीला आपली ओळख जाहीर करावी लागेल.

तसे, याबाबतची माहिती पॉवरबॉल जॅकपॉटने अलीकडेच शेअर केली होती.