एकाच घरात, एका छताखाली राहून इथे वेगवेगळी भाषा बोलतात पती-पत्नी, अजब परंपरा पाहून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:39 IST2025-09-02T15:13:15+5:302025-09-02T15:39:38+5:30
Ubang Village Nigeria: उबांग गावातील ही परंपरा जगात खूप वेगळी मानली जाते. इथे पुरूष आणि महिला वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतात.

Ubang Village Nigeria: जगातील प्रत्येक समाजाची आणि संस्कृतीची एक आपली वेगळी भाषा असते. जी त्यांची ओळख असते. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, एक असंही गाव आहे जिथे पती-पत्नी एक भाषा बोलत नाहीत. नायजेरियाच्या उबांग (Ubang) गावात पती आणि पत्नी एकमेकांसोबत बोलण्यासाठी वेगवेगळ्या भाषांचा वापर करतात.
उबांग गावातील ही परंपरा जगात खूप वेगळी मानली जाते. इथे पुरूष आणि महिला वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतात. म्हणजे इथे पुरूष कपड्यांना नाकी म्हणतात, तर महिला अरिगा म्हणतात. पुरूष झाडांना किची म्हणतात, तर महिला ओक्वेंग म्हणतात. हा केवळ उच्चाराचा फरक नाही तर, पुर्णपणे शब्दावली वेगळी आहे.
येथील लहान मुलांच्या जीवनात ते दहा वर्षाचे झाल्यावर मोठा बदल होतो. बालपणी मुलं आणि मुली आपल्याकडे आईकडे राहून दोन्ही भाषा शिकतात. पण 10 वयानंतर त्यांना आईची भाषा सोडून पुरूषांची भाषा स्वीकारावी लागते. ही येथील समाजाची परंपरा आहे.
गावातील वयोवृद्ध सांगतात की, ही परंपरा त्यांच्या धार्मिक मान्यतांशी जुळलेली आहे. असं म्हटलं जातं की, देव जेव्हा वेगवेगळ्या भाषा दानव आणि मनुष्यांना वाटत होते, तेव्हा उबांग गावाला ही अनोखी व्यवस्था मिळाली. ज्यात पुरूष आणि महिला वेगवेगळी भाषा बोलतात. याच कारणानं हे गाव जगभरात फेमस आहे.
अलिकडे नायजेरियामध्ये इंग्रजीचा प्रभाव वेगानं वाढत आहे. तरूण लोक इंग्रजीला महत्व देत आहेत. ज्यामुळे उबांग गावातील दोन्ही जुन्या पारंपारिक भाषा धोक्यात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या भाषा कुठेही लिखित स्वरूपात नाहीत, केवळ मौखिक आहेत. जर नवीन पिढीने या भाषा जपल्या नाही तर नष्ट होतील.
जगात वेगवेगळ्या अजब परंपरा असतात. पण पती-पत्नी एकाच घरात, एकाच छताखाली राहून वेगवेगळ्या भाषा बोलतात हे खूप अनोखं आहे. या परंपरेमुळे उबांग गावाला जगात वेगळं स्थान आहे.